कचरा व्यवस्थापनातील कोट्यवधीचा भ्रष्टाचार पृथ्वीराज यादव यांनी कागदोपत्री केला उघड 

Spread the love

 

 

शिरोळ / प्रतिनिधी 

 

शिरोळ नगरपरिषद क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा पर्दाफाश युवानेते व माजी उपसरपंच पृथ्वीराजसिंह यादव यांनी केला आहे.गुरुवार,दिनांक २६ जून रोजी त्यांनी नगरपरिषद कार्यालयात जाऊन मुख्याधिकाऱ्यांकडून ठेकेदाराच्या कामगारांची प्रत्यक्ष पाहणी केली.या पाहणीत ठेकेदाराने ७८ कामगार असल्याचे भासवून बिलं सादर केली असल्याचे समोर आले.मात्र प्रत्यक्षात केवळ ३८ कामगारच कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले.कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने शहरातील व उपनगरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे मोठे ढीग साचले असून,नियमित घंटागाड्या फिरवण्यातही गंभीर दुर्लक्ष केले जात आहे.यामुळे संपूर्ण शहराची स्वच्छता व्यवस्था कोलमडली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ठेकेदाराने शासन व नागरिकांची फसवणूक करून सरकारी निधीचा अपहार केल्याचा आरोप करत,या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी जोरदार मागणी पृथ्वीराज यादव यांनी केली आहे.या प्रकारामुळे नगरपरिषद प्रशासनाची कार्यपद्धती आणि ठेकेदारावरील नियंत्रण यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शिरोळ शहरातील नागरिकांतूनही या भ्रष्टाचाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून कारवाई करावी अशी नागरिकांचीही जोरदार मागणी आहे.

error: Content is protected !!