पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोप फाटा येथील साई स्ट्री हॉटेल समोर बुधवारी संध्याकाळी अज्ञात डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात गोटखिंडी (ता. वाळवा) येथील कांचन शिवाजी गावडे (वय ७०) या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा सुनील शिवाजी गावडे हे गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना बुधवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती शिरोली पोलिसातून मिळाली आहे. मिळालेली माहिती अशी की गावडे मायलेक टोप येथे सुनील याच्या सासुरवाडीतून परत गावी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. सुनील यांच्या पत्नी आजारी असल्याने त्यांना टोप येथे सोडून आईला गावी नेण्यासाठी ते निघाले होते.दरम्यान,बेंगलोरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अज्ञात डंपरने त्यांच्या दुचाकी (क्रमांक MH 10 CZ 7983) ला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कांचन गावडे रस्त्यावर पडल्या आणि त्यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर डंपरचा चालक घटनास्थळावरून पसार झाला.सध्या टोप येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे महामार्गावर सायंकाळच्या वेळेस मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.या अपघातानंतर हायवे ट्राफिक पोलीस व शिरोली एमआयडीसी पोलीस हे वाहतूक सुरळीत करण्यात अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.अपघातास जबाबदार कोण? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.