नृसिंहवाडीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ दक्षिणद्वार सोहळ्यास काही तासांचीच प्रतीक्षा

Spread the love

नृसिंहवाडी / प्रतिनिधी 

धरण क्षेत्रात संतत पावसाचा जोर कायम असून, कृष्णा नदीच्या जलस्तरात रात्रीतून तब्बल पाच फूट वाढ झाल्याने नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात मध्यरात्री दीडच्या सुमारास नदीचे पाणी प्रवेशले आहे.परिणामी,यावर्षीचा पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा आज दुपारपर्यंत पार पडण्याची शक्यता श्री दत्त देवस्थान समितीने व्यक्त केली आहे.चार दिवसांपूर्वी नदीचे पाणी गाभाऱ्याजवळ येऊन परतले होते.मात्र गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, धरणांतून पाण्याचा विसर्गही सुरू आहे.यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. श्री दत्त देवस्थान नृसिंहवाडी यांच्यावतीने याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली.देवस्थान समिती व पुजारी वर्गाने दिलेल्या माहितीनुसार,नदीचे पाणी मंदिरात प्रवेश केल्याने दक्षिणद्वार सोहळ्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती तयार झाली असून,भाविकांनी खबरदारी घेऊन दर्शनासाठी यावे,असे आवाहन करण्यात आले आहे.दरवर्षी कृष्णा नदीतील चढत्या पाण्यामुळे दत्त मंदिरात होणारा दक्षिणद्वार सोहळा भाविकांसाठी एक भक्तिभावाने भरलेला विशेष क्षण असतो.यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा आजच पार पडणार असल्याने परिसरात भक्तमंडळींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

error: Content is protected !!