पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
शिरोली येथे एका मित्रानेच आपल्या जवळच्या मित्राची सुमारे दोन लाख रुपये रक्कम लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याबाबत वैभव विष्णू माजगावकर (रा. शिरोली) यांनी धनराज उर्फ धनाजी कुमार गुरव (रा.शिरोली) याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.तक्रारीनुसार,वैभव आणि धनराज हे दोघे चांगले मित्र असून गावात त्यांची जोडगोळी परिचित आहे.३१ मे २०२५ रोजी रात्री ७ ते ८ या वेळेत ते दोघे टोप येथील एका बारमध्ये गेले होते.तेथे त्यांनी मद्यप्राशन केले.बारचे ५ हजार रुपयांचे बिल भरण्यासाठी वैभवने धनराजला आपल्या गाडीतील डिग्गीतून पैसे आणायला सांगितले.गाडीत एकूण दोन लाख रुपये होते.धनराजने पैसे आणून बिल भरले,मात्र उर्वरित १ लाख ९५ हजार रुपये त्याच्याकडेच राहिले. त्याच रात्री त्यांनी शिरोलीतील एका हॉटेलमध्ये जेवण करून घरी परतले.यानंतर वैभवने धनराजला अनेकदा फोन करून पैसे मागितले असता ‘सकाळी देतो’ असे सांगून त्याने वेळ मारून नेली.परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून त्याने ना भेट घेतली ना पैसे परत केले.या प्रकारामुळे वैभवने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास शिरोली पोलीस करीत आहेत.