कोल्हापूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कामगिरी केली आहे.या पथकाने कौशल्यपूर्वक तपास करत तब्बल ११ मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी मोटरसायकल चोरीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना तपासासाठी विशेष पथक गठित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.यानुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास सुरु केला. तपासादरम्यान पथकातील अंमलदार वसंत पिंगळे आणि संजय हुंबे यांना फिरोज यरगट्टी (२३, रा. उचगाव) व इरफान खान (२४, रा. विक्रमनगर) हे दोघे संशयित इसम बागल चौकात चोरीच्या स्प्लेंडर मोटरसायकलसह आढळल्याची माहिती मिळाली.लगेचच सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले.चौकशीत त्यांनी कोल्हापूर, करवीर, वडगांव, शिरोली एमआयडीसी आणि सांगली येथून मिळून एकूण ११ मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याकडून सर्व चोरीच्या गाड्या जप्त केल्या आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील व बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकाने केली. दोन्ही आरोपींना शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात देण्यात आले असून, आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई : मोटरसायकल चोरीचे ११ गुन्हे उघड
पुलाची शिरोली / कुबेर हंकारे