संजय गांधी समिती अध्यक्षपदावरून “या“ पक्षात धुसपूस

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी 

 

हातकणंगले तालुक्यात संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदावरून जनसुराज्य पक्षात सध्या प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेली अनेक वर्षे पक्षासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्याची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने जुने कार्यकर्ते नाराज झाले आहेत.त्यामुळे पक्षात अंतर्गत कलहाचे वातावरण तयार झाले असून भविष्यात फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या निवडीमुळे जनसुराज्य पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत तीव्र नाराजी आहे.हातकणंगले तालुक्यात पक्षाच्या उभारणीत ज्यांनी मोलाची भूमिका बजावली,अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना जनसुराज्य पक्षाचे आमदार अशोकराव माने यांनी दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.अध्यक्ष पदासाठी डावलणे हे पक्षासाठी धोकादायक ठरू शकते असे बोलले जात आहे.या प्रकारामुळे तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून जनसुराज्य पक्षाचे दोन गट निर्माण होत असल्याचे दिसत आहे.एक गट आमदार माने यांच्या नेतृत्वाचा समर्थन करत आहे,तर दुसरा गट जुन्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप करतोय.या पार्श्वभूमीवर लवकरच पक्षामध्ये खुले चर्चासत्र घेऊन नाराज कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्याची मागणी होत आहे.स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी वेळेत निवारण न झाल्यास आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्याच्या घडामोडींवर आमदार माने यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली,तरी पक्षातील अंतर्गत असंतोष लक्षात घेता त्यांना लवकरच भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.अन्यथा,हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य पक्षाच्या भविष्यासाठी हे वादळ गंभीर ठरू शकते.

error: Content is protected !!