शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ या ऐतिहासिक नगरीत समाजभिमुख कार्यातून स्वतःची ओळख निर्माण करणारे अनेक व्यक्तिमत्व चर्चेत असतात.अशा अनेक व्यक्तिमत्वापैकी प्रतिकूल परिस्थितीत व संघर्षातून निर्माण झालेले व्यक्तिमत्व म्हणजे शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व आदर्श पत्रकार चंद्रकांत तुकाराम भाट हे होय. आज वाढदिवसानमित्त थोडक्यात त्यांचा परिचय…
शिरोळ येथील एका सामान्य कुटुंबात ४ जून १९८० रोजी चंद्रकांत भाट यांचा जन्म झाला. घरची गरीब परिस्थिती आणि आई-वडिलांच्या कष्टाची कहाणी थक्क करणारी आहे.वयाच्या नवव्या वर्षी वडिलांचे छत्र हरविल्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करताना त्यांना शालेय जीवनापासूनच नेहमीच त्यांच्या मित्र परिवाराची साथ लाभत राहीली. घरच्या चार भिंतीच्या संस्कार केंद्रात आणि समाजाच्या विशाल सागरात अनुभवातून तर कधी शिक्षणातून माणूस आणि मानवतेच्या लोकसेवेचे नवे धडे मिळाले. त्यामुळे स्वतःच्या जीवनात आलेल्या संकटासारखे इतरांचे जीवन नसावे.समाजातील सामान्य गोरगरीब व उपेक्षित घटकांसाठी काम केले पाहिजे ही भूमिका घेऊन पत्रकार चंद्रकांत भाट यांनी नोकरीपेक्षा सामाजिक कार्याला वाहून घेतले.सत्य व प्रामाणिक विचारधारा. स्पष्ट वक्तेपणा आणि बेधडक स्वभाव वैशिष्ट्य असल्याने विचारांशी कधीही त्यांनी तडजोड केली नाही.जे आहे ते स्पष्ट आणि उघडपणे विचार व्यक्त करून समाजभान जपत वैचारिक पातळीवर मैत्रीचा मोठा परिवार जपला आहे.
शिक्षणाच्या प्रवाहात राहुन माध्यमिक पर्यंत शिक्षण घेतलेल्या पत्रकार चंद्रकांत भाट यांना आई-वडिलांचा आशीर्वाद, शिक्षक आणि जेष्ठ मंडळींचे मार्गदर्शन आणि मित्र परिवारांची भक्कम साथ लाभली आहे. समाज व शिरोळ शहरातील कोणत्याही सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेवून जनहितार्थ सेवार्थ योगदान देतात. विशेषतः दुःखाच्या प्रसंगी आधार देत अनेक कुटुंबांची नाती त्यांनी जपली आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यातील प्रामाणिक निष्ठा आणि आगळे वेगळे व्यक्तिमत्व म्हणून चंद्रकांत भाट यांच्याकडे पाहिले जाते.
या समाजकार्यातूनच पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे २० वर्षापूर्वी पदार्पण झाले.पत्रकारिता क्षेत्रात पुढे येताना पुन्हा त्यांनी संघर्षाच अनुभवला आहे. वृत्तपत्र क्षेत्रात पत्रकार व दैनिकांची स्पर्धा आणि नवे आव्हान स्वीकारताना त्यांनी हिंमत सोडली नाही. दैनिक जनप्रवासचे पत्रकार म्हणून प्रारंभी त्यांनी वृत्तपत्र क्षेत्रात प्रवेश केला. एका सामान्य कुटुंबातील तरुण पत्रकार क्षेत्रात काम करताना समाजानेही तेवढ्याच ताकतीने साथ सोबत दिली. काही पत्रकार मित्रांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे दैनिक प्रतिध्वनी,दैनिक राष्ट्रगीत,दैनिक महान कार्य,दैनिक लोकनेता,साप्ताहिक मंत्रपुष्प अशा वृत्तपत्रात काम करून अनुभवाची शिदोरी त्यांनी जोपासली.अभ्यासू पत्रकारितेसाठी शब्द आणि अक्षरांचा प्रपंच वाढवीत वाचनावर जोर दिला.त्यामुळे पत्रकार क्षेत्रातील नवी आव्हाने,शोध पत्रकारिता आणि विशेष लिखाण करून निर्भीड पत्रकार ही स्वतःची ओळख निर्माण केली.गेली काही वर्षे दैनिक नवा महाराष्ट्र वृत्तपत्रात उपसंपादक या पदावर काम ते सेवा कार्य करीत आहेत.
पत्रकार लेखणीतून समाज परिवर्तनाचा त्यांनी विचार जोपासला आहे. पत्रकार हा लेखणीबरोबरच समाजाच्या सुखदुःखात सहभागी होऊन सामाजिक कार्य करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. लहानपणापासूनच सामाजिक सेवाभाव हा स्वभाव असल्याने समाजातील गोरगरीब, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लेखनशैलीचा वापर मोठ्या कौशल्याने केला आहे. शिरोळ तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थितीवर आपल्या लिखानातून त्यांनी नेहमीच सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपल्या पत्रकारितेची वेगळी छाप समाज मनावर उमटवली आहे.
सामान्यांच्या न्याय हक्कासाठी कधी पत्रकार तर कधी सामाजिक कार्यकर्ता म्हणून लढताना त्यांना
आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसे भेटली. बरेच विषय समोर आले. सत्य आणि प्रामाणिकपणाच्या वाटेवरील एक न्यायिक पत्रकार म्हणूनच ते आजही लढत आहेत. सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकारिता या दुहेरी भूमिकेत निःपक्ष , र्निभीड लेखणी आणि न्यायाची भूमिका कधीही सोडली नाही हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. निस्पृह समाज कार्यातील निष्ठा आणि पत्रकारितेतील सत्यवादी व्रतस्थ भूमिका चंद्रकांत भाट यांनी कायम ठेवली आहे.
शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात सर्वच क्षेत्रातील, राजकिय पक्ष व गटा तटातील अनेक कार्यकर्ते, नेते
यांच्याशी त्यांचा थेट संपर्क आहे. प्रशासनातील अधिकारी वर्गाशीही त्यांनी सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. त्याचा उपयोग ते अतिशय खुबीने आपल्या सामाजिक कार्यात तसेच सामान्यांच्या न्याय हक्कासाठी करताना दिसतात.
पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक गरजू, गरीब व वंचितांना न्याय मिळवून देताना प्रशासन, राजकीय नेते किंवा समाजहिताच्या विरोधात भूमिका पुढे आली तर त्यांनी अनेकवेळा सडेतोड भाषेत तर कधी लेखणीतून आवाज उठवला आहे .जनतेचे कोणतेही मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी त्यांना दोन वेळा मिळाली. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी निर्माण झालेल्या पत्रकार संघटनेच्या प्रत्येक कामात त्यांचा सहभाग असतो. लोकहिताच्या अनेक आंदोलनात त्यांचा पुढाकार असतो. तालुक्यातील अनेक सामाजीक प्रश्नांची आंदोलने, महापूर, कोरोना सारख्या आपत्तीत त्यांनी निर्भिड आणि नि:पक्षपणे सामाजिक भावनेतून योगदान दिले आहे.
शिरोळ तालुक्यात महापुरा सारख्या उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत असताना तालुक्यातील जनता व त्यांच्या पशुधनाच्या मदतीसाठी दिवसरात्र त्यांनी परिश्रम घेतले आहेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून पूरग्रस्त निवारा केंद्रात पूरग्रस्तांची भोजनाची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला. कोरोना काळात रुग्णांना वेळेत उपचार व्हावेत, त्यांना वेळेत बेड व औषधे मिळावीत यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा केला होता.सहकारी मित्रांची साथ घेवून शिरोळ शहरातील लहान मुलांचे कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात त्यांचा पुढाकार होता. रुग्णाना वेळेत उपचार मिळाल्याने अनेकांना जीवदान मिळाले आहे.
त्यामुळे सामाजिक संस्थांनी पत्रकार चंद्रकांत भाट यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित केले आहे.
शाळाबाह्य मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे. ज्यांना शिक्षण घेता येत नाही अशा मुलांना मदत मिळाली पाहिजे ही भूमिका घेऊन पत्रकार चंद्रकांत भाट यांनी
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, शैक्षणिक प्रवेशासाठी दाखले वेळेत मिळवून देणे महत्त्वाच्या कामातही त्यांनी आपला वेळ दिला आहे.
सामाजिक समतेचा विचार देणाऱ्या प्रत्येक वर्षी शिरोळ उरूस संयोजनाबरोबरच गावच्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहेत.शिरोळ येथील राजाराम विद्यालय क्र. २ च्या शालेय व्यवस्थापन समितीचे ते सदस्य, शिरोळ रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे खजिनदार, शिरोळ शहर व तालुका पत्रकार संघावर कार्यकारिणी सदस्य, राजा शिवछत्रपती मंडळाचे सचिव व बुवाफन महाराज भक्त मंडळाचे उपाध्यक्ष यासह शहरातील अनेक सामाजिक संस्था व तरुण मंडळाच्या माध्यमातून विधायक कार्यात त्यांचा विशेष सहभाग आहे. सुखापेक्षा संकटाच्या क्षणाला आणि मदतीला धावून येणारा “आपला हक्काचा माणूस” असा त्यांचा परिचय शिरोळ तालुक्याला आहे. चंद्रकांत भाट यांचा मित्रपरिवार मोठा असून सामाजिक कार्याला गती मिळावी यासाठी काही मित्रमंडळी व जनतेने दुचाकी व चार चाकी गाडी भेट देऊन त्यांना बळ दिले आहे.
पत्रकार चंद्रकांत भाट यांच्या कार्याची दखल घेऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकार गौरव, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आत्मसन्मान गौरव, भीम कायदा आदर्श पत्रकार, बसवभूषण आदर्श पत्रकार अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. निकोप समाज निर्मितीचा ध्यास घेतलेल्या संवेदनशिल व समाजभान जपणारा सामाजिक कार्यकर्ता व आदर्श पत्रकार म्हणून अभिमान वाटतो. वर्तमानाच्या खांद्यावर बसून भविष्याचा वेध घेणाऱ्या व लोकहिताचा ध्यास घेवून समाजाप्रती आयुष्य खर्ची घालणाऱ्या पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता या मित्राला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो अशा मनापासून शुभेच्छा !
शब्दांकन
डॉ.दगडू माने
ज्येष्ठ पत्रकार व सिनेअभिनेता,शिरोळ