शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांनी आपल्या 68 व्या वाढदिवसानिमित्त यंदाही एक आगळा वेगळा उपक्रम राबवला.आज रविवार दिनांक 1 जून सकाळी पावणे सहा ते दहा या वेळेत त्यांनी येथील कल्लेश्वर उद्यानामध्ये सलग चार तास उलटे चालण्याचा संकल्प पूर्ण केला.हेरवाडे हे दरवर्षी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्याचे वेगळेपण जपतात.याआधी त्यांनी अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी स्मशानभूमीत रक्तदान शिबिर,वृक्षारोपण,अवयवदान जनजागृती आणि स्वच्छता मोहिमांचे आयोजन केले आहे.या वर्षी त्यांनी नागरिकांच्या आरोग्यविषयी जनजागृती करण्याचा उद्देश ठेवून ‘उलटे चालणे’ या व्यायामप्रकाराची निवड केली.उलटे चालणे किंवा धावणे हा एक सोपा आणि परिणामकारक व्यायामप्रकार आहे,”असे हेरवाडे यांनी सांगितले.यामुळे गुडघ्यांना कमी ताण येतो,पाठदुखी कमी होते,मानसिक एकाग्रता वाढते तसेच शरीराचा समतोल राखण्यास मदत होते.दररोज काही मिनिटे उलटे चालल्याने वजन नियंत्रित ठेवणे आणि स्नायू बळकट करणे शक्य होते,”असेही त्यांनी नमूद केले.त्यांच्या उपक्रमामुळे सामाजिक कार्य आणि आरोग्यविषयक जनजागृतीचा एक सुंदर संगम घडताना दिसला.खंडेराव हेरवाडे यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी पुन्हा एकदा वाढदिवस साजरा करण्याची नवी दिशा समाजासमोर ठेवली आहे.