शिरोळ / प्रतिनिधी
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेल्या शिरोळ येथील कलेश्वर तलाव परिसराच्या सुशोभीकरणाचे चित्र सध्या अतिशय दयनीय झाले आहे.नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विविध सुविधा सध्या दुर्लक्षित असून शिरोळ नगर परिषदेच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांनी आज रविवार दिनांक 1 जून रोजी सकाळी 10 वाजता तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ओपन जिम,लहान मुलांसाठी खेळणी, वयोवृद्धांसाठी कट्टे, वॉकिंग ट्रॅक आदी सुविधा वापरण्याच्या अयोग्य स्थितीत आहेत.पेव्हिंग ब्लॉक निघून गेले असून त्यामुळे वयोवृद्धांना चालताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.संपूर्ण परिसर अस्वच्छ बनल्यामुळे साप,सरपटणारे प्राणी यांचा धोका वाढला आहे.स्वच्छतेच्या अभावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तलाव परिसरात दोन शौचालये उभारण्यात आली असली तरी ते गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत.त्यामुळे महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.या ठिकाणी सुरक्षेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील गायब झाले आहेत, याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.या सर्व गोष्टींमुळे लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेले उद्यान अक्षरशःमोडकळीस आले आहे.नगर परिषद प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देत परिसराची दुरुस्ती व नियमित देखभाल करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.ज्येष्ठ नागरिक,महिला आणि लहान मुलांसाठी उपयोगी असलेल्या या उद्यानाची अशी अवस्था झाल्यामुळे प्रशासनाविरोधात नाराजीचा उमटू लागला आहे.