शिरोळ / प्रतिनिधी
जयसिंगपूर-नांदणी मार्गावर असलेल्या शिवानंद पिठाची गिरण संभाजीपुर नजीकच्या विहिरीत पोहायला गेलेल्या नितीन रवींद्र मनकट्टे (वय १३ रा. बावन झोपडपट्टी, शाहूनगर, जयसिंगपूर) या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याबाबतची नोंद रात्री उशिरा पोलिसात करण्यात आली .याबाबत घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी, जयसिंगपूर येथील शाहूनगरातील शालेय मुले पोहण्यासाठी नांदणी मार्गावर शिवानंद पिठाची गिरण संभाजीपूर जवळ असणाऱ्या विहिरीत गेले होते.यावेळी पोहताना नितीन रवींद्र मनकट्टे हा बुडाला.घटनास्थळी इतर मुलानी आरडा ओरड केली मात्र तो बुडाला होता.घटनेनंतर शिरोळ पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनात कार्यरत असलेल्या वजीर रेस्क्यू फोर्स या संस्थेच्या जवानांना पाचारण केले. जवानांनी तातडीने शोधमोहीम सुरू करून काही वेळातच नितीनचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.या घटनेमुळे जयसिंगपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पळवून टाकणारा होता.