कुरुंदवाड / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने राष्ट्र सेवा मंडळ, कुरुंदवाड यांच्यावतीने आयोजित अखिल भारतीय निमंत्रित पुरुष व राज्यस्तरीय निमंत्रित महिला प्रो कबड्डी स्पर्धा 1 मे ते 4 मे दरम्यान कुरुंदवाड येथील ऐतिहासिक तबक मैदानावर भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार आहे.
या स्पर्धेसाठी आयोजकांच्यावतीने जय्यत तयारी सुरू आहे. स्पर्धेसाठी दोन स्वतंत्र क्रीडांगणे तयार करण्यात आले असून, प्रेक्षकांची व्यवस्था, संघांचे निवास, जलपान व सुरक्षा यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
संघांचे स्वागत करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आकर्षक स्वागत कमान उभारण्यात आली आहे,नेेत्रदीपक विद्युतझोत आणि गुण व निकाल दर्शवणारी डिजिटल यंत्रणाही लावण्यात येत आहे.या स्पर्धेचे उद्घाटन 1 मे रोजी दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. उद्घाटन समारंभ आम.डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, आम.डॉ.अशोकराव माने,उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते तर जनसुराज्य चे प्रदेशाध्यक्ष समित कदम शिवसेना (उबाठा)चे जिल्हाप्रमुख संजय पवार,
मुख्याधिकारी टीना गवळी, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, रामचंद्र डांगे, जयराम पाटील आजींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
चार दिवसीय स्पर्धेदरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या दिपाली सय्यद-भोसले, अभिनेत्री सई ताम्हणकर,शितल ढेकळे यांच्यासह मान्यवर भेट देणार आहेत.
या स्पर्धेत देशभरातील नामांकित पुरुष कबड्डी संघ व महाराष्ट्रातील आघाडीच्या महिला कबड्डी संघांचा समावेश असून, प्रो-कबड्डीच्या धर्तीवर जलदगती आणि आक्रमक खेळाचे दर्शन रसिकांना घडणार आहे.
राष्ट्र सेवा मंडळाचे जवाहर पाटील, अभिजित पाटील, मोहन मोहिते, शरद आलासे, प्रकाश मोहिते, शरद तावदारे,आणि आयोजकांनी नागरिक व क्रीडा रसिकांनी या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.