“शैक्षणिक गुणवत्तेचे माहेरघर द्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल”

Spread the love

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे 

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात वसलेल्या शिरोली या गावात एक शैक्षणिक क्रांती होत आहे.शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात नवी दिशा देण्याचे कार्य “द्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल” करत आहे.२०१६-१७ साली सुरू झालेल्या या शाळेने अल्पावधीतच गुणवत्तेच्या जोरावर परिसरातील अनेक गावांतील पालकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

 

या शाळेची स्थापना संतोष बाटे या तरुण उद्योजकाने आपल्या पत्नी मनीषा बाटे यांच्या सहकार्याने केली.वडिलांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून सुरू झालेली ही शाळा आता ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणाचा एक विश्वासार्ह केंद्रबिंदू ठरली आहे. शिक्षणाची आवड, समाजकार्याचा वसा आणि आधुनिकतेचा समतोल राखत ही शाळा इतर शाळांसाठी आदर्श ठरत आहे.

स्थापनेपासूनची वाटचाल

सुरुवातीला प्ले ग्रुप आणि नर्सरी या दोन वर्गांसह सुरू झालेली शाळा आज सहावीपर्यंत विस्तारली आहे.पहिल्याच वर्षी ६०-६५ विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.ही संख्या आता २२५ पर्यंत पोहोचली आहे. शाळेच्या शिक्षण पद्धतीत सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जात असल्यामुळे नागाव, शिये, यादववाडी,गावभाग,टोप अशा परिसरातूनही विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येऊ लागले आहेत.

सीबीएसई पॅटर्नची आधुनिक शिक्षण प्रणाली

द्विंकल स्टार स्कूल ही शाळा सीबीएसई पॅटर्ननुसार चालवली जाते.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान न राहता त्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यावर भर दिला जातो.इंग्रजी शिक्षणासोबतच मराठी व हिंदी विषयांवरही भर देण्यात येतो,त्यामुळे मातृभाषेची जाणीवही विद्यार्थ्यांमध्ये घट्ट बसते.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासावर लक्ष

शाळेचे नियोजन अत्यंत काटेकोर असून बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारच्या क्षमतांचा विकास करण्यात येथे प्राधान्य दिले जाते.संगणक शिक्षण,गणित व वक्तृत्व स्पर्धा, शाळाबाह्य परीक्षा,वाचनसंवर्धन उपक्रम हे सर्व उपक्रम शाळेच्या दिनक्रमात समाविष्ट आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास,संवाद कौशल्य,विचारशक्ती आणि सर्जनशीलतेचा विकास होतो.

शारीरिक कसरतीसाठी कराटे,लाठी-काठी, स्पोर्ट्स,डान्स आणि पारंपरिक लेझीमसारख्या क्रिया विद्यार्थ्यांना शिकविल्या जातात.यामुळे विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहतात आणि खेळातून अनुशासनही आत्मसात करतात.

सुव्यवस्थित भौतिक सुविधा

शाळेतील भौतिक सुविधा देखील अत्यंत प्रशंसनीय आहेत.प्रत्येक वर्ग सुशोभित असून ‘बोलक्या भिंती’ (Talking Walls) सारखी कल्पक योजना राबवली गेली आहे.या भिंतींवरून विद्यार्थी सहज आणि आनंददायी पद्धतीने माहिती ग्रहण करू शकतात.

शाळेत खेळण्यासाठी स्वतंत्र मैदानाची व्यवस्था आहे.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित केली गेली आहे. शाळेच्या वाहनसेवेमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि वेळेवर घरून शाळेपर्यंत आणि परतीचा प्रवास करता येतो.

पालक-सहभाग आणि सामाजिक भान

शाळेत पालकांसाठी वेळोवेळी विविध स्पर्धा व उपक्रम घेतले जातात.महिला दिन,गुरुपौर्णिमा यांसारख्या संस्कारमूल्य वाढवणाऱ्या सणांचा आनंद लहानग्यांपासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत साजरा केला जातो.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत होते.शाळेच्या प्रत्येक उपक्रमात पालकांचा सहभाग हा केवळ औपचारिक न राहता सक्रिय राहतो.

गुणवत्तेची दिशा आणि भविष्यकालीन योजना

द्विंकल स्टार स्कूलच्या यशामागे शिस्तबद्ध व्यवस्थापन, तज्ज्ञ शिक्षकवर्ग आणि शाळा व्यवस्थापन समितीचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.या शाळेत कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही.माफक फीमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण देणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.भविष्यात या शाळेचा विस्तार दहावीपर्यंत करण्याचे नियोजन सुरू आहे.

उत्कृष्टतेचा नवा अध्याय

आज ग्रामीण भागात दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळणे हे अनेकांसाठी स्वप्नवत ठरते.पण द्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलने हे स्वप्न वास्तवात आणले आहे.येथील विद्यार्थी केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर नैतिक, सामाजिक,

शारीरिक दृष्ट्याही सक्षम बनत आहेत.ही शाळा ग्रामीण भागात आधुनिकतेचा आदर्श ठरत असून शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय लिहीत आहे.

error: Content is protected !!