डॉ.स्नेहल उपाध्ये यांच्या मृत्यूस जबाबदार वाहन चालक सूर्यकांत कुरडे फरार

Spread the love

जांभळी अपघातातील डॉ.स्नेहल उपाध्ये यांना न्याय मिळणार का?

मृत्यूस जबाबदार वाहन चालक सूर्यकांत कुरडे फरार

शिरोळ / प्रतिनिधी

जांभळी (ता.शिरोळ) येथे महिंद्रा जिटो चारचाकी व मोपेड यांच्यात झालेल्या अपघातात डॉक्टर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी १ मे २०२५ सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली.अपघातात मोपेड वरील डॉ.स्नेहल विजय उपाध्ये (वय 30 रा. हरोली ता.शिरोळ) या महिलेचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी महिंद्रा जितो (क्र.एम एच 09 ई एम 7109) चालक सूर्यकांत अण्णा कुरडे (रा.नांदणी ता.शिरोळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार अशी माहिती शिरोळ पोलिसातून देण्यात आली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,हरोली येथील डॉक्टर स्नेहल उपाध्ये या आपल्या मोपेड वरून जांभळी मार्गे कामावर जात होत्या.जांभळी येथील तानाजी रणखांबे यांच्या घरासमोर आल्यानंतर महिंद्रा जिटो वाहनाने भरधाव वेगाने रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या मोपेडला धडक दिली.या धडकेत मोपेडवरील स्नेहल उपाध्ये या गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.पण वेळीच उपचार मिळाले असते तर डॉ स्नेहल उपाध्ये यांच्या जीव वाचला असता पण अपघातानंतर जिटो चालक फरार झाला.जरा माणुसकी दाखवली असती तर आज एका सुशिक्षित महिलेचा जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया घटनास्थळावरून व्यक्त करण्यात येत होत्या.यावेळी अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी पाहणी पंचनामा केला.
याप्रकरणी शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अभिजीत कांतीनाथ ऐनापुरे (रा. हरोली,ता.शिरोळ) यांनी फिर्याद दिली आहे.घटनेनंतर संशयित आरोपी वाहन चालक सूर्यकांत कुरडे हा जखमी महिलेची मदत न करता व अपघाताचे माहिती पोलिसांना न कळवताच फरार झाल्याने शिरोळ पोलिसासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

 

चालक सूर्यकांत कुरडे अद्याप फरार झाल्याने तपास यंत्रणेवर संशय

डॉ स्नेहल उपाध्ये यांच्या अपघातानंतर त्यांची मोटर सायकल शिरोळ पोलीस ठाण्यात आणण्यात आली.मात्र जे दूध वाहतुक करणारे चार चाकी वाहनाने अपघात घडून मृत्यूस कारणीभूत ठरले ते वाहन शिरोळ पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी रात्री दहा वाजेपर्यंत आणण्यात आले नव्हते.तर चालक सूर्यकांत कुरडे अद्याप फरार झाल्याने तपास यंत्रणेवर संशय हरोली व जांभळी गावातील नागरिकातून व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!