शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील शिवाजी चौकात गेल्या 14 दिवसापासून शहरात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा नागरिकांना वेळेत शुद्ध पाणी मिळावे व शासनाकडून मंजूर झालेली अमृत पाणी योजना तात्काळ पूर्ण करावी या मागणीसाठी पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी नगरपरिषद प्रशासन आणि आंदोलकात बैठक झाली.मात्र या बैठकीत कोणताच ठोस निर्णय झालेला नाही.त्यामुळे आज बुधवारी गोंधळ घालून प्रशासनाला जागे करण्याचे अभिनव आंदोलन करण्यात आले.शहरातील अंबाबाई गोंधळ मंडळ व नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा व्यक्त केला.दिवसभर प्रशासनाच्या नावाने गोंधळ घालत नगरपरिषदेच्या प्रशासनाला सुद्ध बुद्धी दे असे म्हणत आई अंबाबाई,तुळजाभवानी यांना साकडे घालण्यात आले.यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आरगे, पत्रकार दगडू माने, चंद्रकांत भाट, देवप्पा पुजारी, भगवान आवळे,हेमलता जाधव यांच्यासह नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.यावेळी युवानेते पृथ्वीराजसिंह यादव म्हणाले की,जोपर्यंत प्रशासन शिरोळकरांच्या प्रश्नांची दखल घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.
या आंदोलनाची टप्प्याटप्प्याने तीव्रता वाढवून प्रशासनाला आंदोलनाची दखल घेण्यास भाग पाडू असे त्यांनी सांगितले.