साश्रूनयनांनी दिला जवान सुरज पाटील यांना अखेरचा निरोप

Spread the love

अमर रहे अमर रहे सुरज पाटील अमर रहे

हजारोंनी साश्रूनयनांनी दिला अखेरचा निरोप
शिरोळ / प्रतिनिधी 
अमर रहे अमर रहे सुरज पाटील अमर रहे भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा आणि आजी-माजी सैनिक विविध क्षेत्रातील मान्यवर एनसीसी विद्यार्थी यासह हजारो संख्येच्या उपस्थितीत शिरोळचे सुपुत्र आणि देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले जवान सुरज भारत पाटील यांच्यावर आज शिरोळ येथील जगदाळे वैकुंठधाम येथे शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या साश्रूनयनांनी जवान सुरज पाटील यांना अखेरचा निरोप देण्यात आला. शहरातील सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे बॉम्बे इंजिनियर बटालियनमध्ये ‌ सेवेत असणारे सुरज भारत पाटील यांना शनिवारी कर्तव्य बजावत असताना वीर मरण आले. त्यांचे पार्थिव रविवारी उत्तर प्रदेशातून दिल्लीत आणण्यात आले त्यानंतर सायंकाळी पुण्यात पार्थिव आले. त्या ठिकाणी बॉम्बे इंजिनियर बटालियनमार्फत सुरज पाटील यांना मानवंदना देण्यात आली.
सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जवान सुरज पाटील यांचे पार्थिव शिरोळ नगरीत आल्यानंतर येथील दत्त कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. शिरोळ पोलीस ठाणे येथे पोलिसांनी मानवंदना दिली. आमदार दलित मित्र अशोकराव माने यांनी जवान सुरज पाटील यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
शिरोळ नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने प्रशासक निशिकांत प्रचंडराव यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर येथील अजिंक्यतारा मंडळ येथे पार्थिव आल्यानंतर मंडळाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. सुरज पाटील यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांचे वडील भारत पाटील आई सौ. सुरेखा पाटील भाऊ संदीप बहिणी सौ प्रणाली ज्योती प्रियांका आजी श्रीमती भागीरथी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवून टाकणार होता.
या ठिकाणी अमर रहे अमर रहे सुरज पाटील अमर रहे आशा घोषणा देऊन उपस्थित नागरिकांनी अभिवादन केले. पाटील यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर. फुलाने सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत पार्थिव ठेवून ‌ शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा निघाली.जवान सुरज पाटील यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रेस सुरुवात झाली.
सदर अंत्ययात्रा कुंभार गल्ली,लक्ष्मी मंदिर,बाजारपेठ, बाल शिवाजी मंडळ, ब्रम्हणपुरी,गावडे गल्ली कोपरा,दत्त मंदिर,जैन बस्ती,भाजी मंडई,छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नृसिंहवाडी रोड स्वामी विवेकानंद मंडळ, हनुमान मंदिर, जगदाळे गल्ली,जय शिवराय मंडळ ते जगदाळे वैकुंठधाम शिरोळ या मार्गावरून अ काढण्यात आली. अंत्ययात्रेदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरज पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ठिकठिकाणी पाटील यांच्या पार्थिवास पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तर शिरोळकर नागरिकांनी व महिलांनी पार्थिवावर पुष्पवृष्टी केली.अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती.
अमर रहे अमर रहे सुरज पाटील अमर रहे भारत माता की जय जय जवान जय किसान वंदे मातरम् अशा घोषणा देण्यात येत होत्या. शहरातील एनसीसी ्चे विद्यार्थी आजी-माजी सैनिक पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे जवान अजिंक्यतारा मंडळ, शहरातील विविध मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते, तरुण वर्ग हिरोजी माने पाटील समाज, यांनी अंतयात्रेचे नियोजन केले.
पंचगंगा नदी काठावरील जगदाळे वैकुंठधाम येथे अंत्ययात्रा आली.भारतीय सैन्य दलातील कर्नल अमरसिंह सावंत,सुभेदार माळी, नायब सुभेदार विजय चव्हाण हवालदार विशाल सूर्यवंशी,माजी आमदार उल्हास पाटील तहसीलदार अनिलकुमार हेळकर, पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, युवानेते पृथ्वीराजसिंह यादव ,अजिंक्यतारा मंडळाचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर, हिरोजी माने पाटील समाजाचे
अध्यक्ष रामचंद्र पाटील, दरगु गावडे आजी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय माने शिरोळ तालुकाध्यक्ष दिनकर घाटगे, शिरोळ अध्यक्ष संजय इंगळे सांगली जिल्हा अध्यक्ष पांडुरंग भोसले, उपाध्यक्ष पांडुरंग इंगळे, सचिव सतीश पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय पाटील, यांच्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील आजी माजी सैनिक विविध क्षेत्रातील मान्यवर विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी जवान सुरज पाटील यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
सैन्य दलाच्यावतीने स्वर्गीय सुरज पाटील यांचे वडील भारत पाटील व त्यांच्या कुटुंबियाकडे तिरंगा ध्वज सोपविण्यात आल्या.यानंतर उपस्थित नागरिकांनी सलामी देऊन व दोन मिनिटं स्तब्धता पाळून सुरज पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. सुरज पाटील यांना सैन्य दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वडील भारत पाटील आणि  भाऊ संदिप पाटील यांनी सुरज पाटील यांच्या पार्थिवास भडाग्नी दिली.यावेळी उपस्थित हजारो साश्रूनयनानी त्यांना अखेरचा निरोप दिला. अमर रहे अमर रहे सुरज पाटील अमर रहे या घोषणेने  परिसर दणाणून गेला.
error: Content is protected !!