शिरोळ नगरपरिषदेच्या अनागोंदी व मनमानी कारभाराविरोधात धरणे आंदोलन करणार – पृथ्वीराजसिंह यादव

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगरपरिषद प्रशासनाकडून अनागोंदी व मनमानी कारभार सुरू आहे.यामुळे शहरातील जनतेला मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. प्रशासनाने लोकहिताची कामे पूर्ण करावी अशी वारंवार मागणी करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. यामुळे नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात गुरुवार दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी शिरोळच्या शिवाजी चौकात बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

यावेळी बोलताना पृथ्वीराजसिंह यादव म्हणाले की शहरामधील नागरिकांना मूलभूत व नागरी सुविधा वेळेवेर मिळत नाहीत. यामध्ये प्रामुख्याने अशुद्ध, खंडित व अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. जनतेला पुरेसे पाणी मिळत नाही. कृष्णा नदीत पाणी आहे मात्र शहरवासीयांना आठ-आठ दिवस पाणी मिळत नाही. गुढीपाडवा आणि रमजान ईद हे सण असूनसुद्धा शहरात सुरळीत पाणीपुरवठा झालेला नाही. यामुळे मी स्वतः टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करीत आहे. पाणी पुरवठ्याकडे नगरपालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. नगरपरिषदेकडून चुकीची व मनमानी पद्धतीची थकबाकी नसताना काढलेल्या कराच्या नोटिसा नागरिकांची डोकेदुखी बनली आहे.घरपट्टी पाणीपट्टी व विविध कर आकारणी अयोग्य पद्धतीने करण्यात आल्याने याचा आर्थिक फटका नागरिकांना बसत आहे. घनकचऱ्याचे बेशिस्त व चुकीच्या व्यवस्थापनामुळे कचरा उठाव न होणे, घंटागाडी वेळेत न येणे, गटारिंची स्वच्छता नाही. याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. याकडेही नगरपालिकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आरोग्य विषयक सुविधा व रोगप्रतिबंधक फवारणी न करणे, जंतु नाशक फवारणी वेळेवर न करणे त्यामुळे डासांची पैदास वाढून साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाकडून गुणवत्ताहीन व निकृष्ट दर्जाची कामे सुरू आहेत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व इतर विभागप्रमुख कार्यालयात सतत गैरहजर राहत असलेने लोकांच्या समस्याचे निराकरण होत नाही. तसेच आरोग्य, बांधकाम व पाणी पुरवठा विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याची साशंकता नागरीकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.

 

 

या प्रमुख मागण्या वारंवार करूनही नगरपरिषदेच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. नागरिकांच्या या मूलभूत समस्यांचे निवारण होण्यासाठी गुरुवार दिनांक ०३ एप्रिल २०२५ पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिरोळ येथे सांविधानिक/सनदशिर मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. असे पृथ्वीराजसिंह यादव यांनी सांगितले.

error: Content is protected !!