शिरोळ / प्रतिनिधी
कनवाड (ता. शिरोळ) येथील घरातील २ लाख २० हजार रुपये किमतीचे ४ तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरल्याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी कनवाडच्या विशाल सुरेश कुपाडे(वय ३० वर्षे) यास अटक करून जयसिंगपूर न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी दिली.
दिनांक १८ ते २० फेब्रुवारी २०२५ च्या दरम्यान कनवाडमधील बनवाडी येथील सौ सुरेखा विजय कुपाडे यांच्या घरातील लोखंडी तिजोरीच्या चोर कप्प्यातील २ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याची पट्टी व काळे मनी असणारे ४ तोळे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद शिरोळ पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.या चोरी संदर्भात पोलिस हावलदार बाबाचांद पटेल यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात आला. या तपासात विशाल सुरेश कुपाडे यास ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे गंठण हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी विशाल कुपाडे यास अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने २८ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक आय. बी. मुल्ला या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक, निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपाधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आय. बी. मुल्ला, पोलिस हावलदार बाबाचांद पटेल, बाळगोंडा पाटील, विजय भांगरे, पोलिस अमलदार सुशांत ठोंबरे संजय राठोड यांच्या पथकाने केली.