शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळचे सुपुत्र, नियोजन मंडळाचे माजी सदस्य व विविध संस्थांचे संस्थापक चेअरमन दलितमित्र डॉ अशोकराव कोंडीराम माने (बापू ) यांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य घेऊन विजयी झाल्याबद्दल नूतन आमदार डॉ अशोकराव माने व त्यांच्या सौभाग्यवती रेखादेवी अशोकराव माने यांचा शिरोळ शहरवासीयांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौकात बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता हा समारंभ होणार असून या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिरोळ ग्रामस्थ गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.येथील छत्रपती शिवाजी चौक येथे जाहीर समारंभात प्रमुख पाहुणे व प्रसिद्ध वक्ते प्रा मधुकर पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नूतन आमदार डॉ अशोकराव माने व सौ रेखादेवी माने यांना कोल्हापुरी फेटा , मानपत्र , आहेर आणि चांदीची तलवार भेट देऊन गौरव करण्यात येणार आहे. यावेळी प्रा मधुकर पाटील यांचे प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे. या सत्कार सोहळा नियोजनासाठी शहरातील सर्वपक्षीय प्रमुख नेते मंडळी ,कार्यकर्ते तसेच शहरातील तरुण मंडळे, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी यांची बैठक झाली असून सत्कार समारंभाची तयारी पूर्ण झाली आहे बुधवारी येथील जय भवानी चौक ते छत्रपती शिवाजी चौक या मार्गावर आमदार डॉ अशोकराव माने यांची सवाद्य जल्लोष मिरवणूक काढण्यात येणार असून यामध्ये झांज पथक, लेझीम ,हलगी वादन यासह लक्षवेधी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळ्यास शहरातील नागरिक , तरुण मंडळे, सेवाभावी संस्था पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या जाणार आहेत. तसेच या मार्गावर रांगोळी व पुष्पवृष्टी करून सत्कारमूर्तींचे स्वागत करण्यात येणार आहे.दरम्यान आमदार अशोकराव माने यांनी शिरोळसह कोल्हापूर जिल्हा व राज्य पातळीवर सहकार , सामाजिक व राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम केले असून सामान्य जनतेच्या प्रश्नाला न्याय देणाऱ्या या नेतृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा नागरिकांनी या समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन शिरोळ ग्रामस्थ सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.