शिरोळ येथे १ फेब्रुवारीला दीनबंधू दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलन
कवी अरुण म्हात्रे संमेलनाध्यक्ष : डॉ. अनिल मडके उद्घाटक
शिरोळ / प्रतिनिधी
येथील शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी अरुण म्हात्रे हे भूषविणार असून संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ धन्वंतरी व साहित्यिक डॉ. अनिल मडके यांचे हस्ते होणार आहे. साहित्य संमेलनात कुरुंदवाडचे ज्येष्ठ कवी, विडंबनकार व गझलकार डॉ. दिलीप पां. कुलकर्णी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने तर दानोळी येथील राष्ट्रीय तिरंदाजी खेळाडू कु.श्रेया केसकर हिला ‘भाई दिनकरराव यादव जिल्हास्तरीय क्रीडा’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार व उपाध्यक्ष डॉ. दगडू माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.दरवर्षी एक फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या साहित्य संमेलनाने शिरोळ परिसरातील साहित्य विश्वात नवचैतन्य निर्माण केले असून प्रतिवर्षी राज्यातील नामवंत साहित्यिकांना निमंत्रित करण्यात येते.यावर्षी ठाणे येथील सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांना संमेलनाध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.अनेक कवी मंच गाजविणाऱ्या अरुण म्हात्रे यांचे सात कवितासंग्रह प्रकाशित असून त्यांना बहिणाबाई पुरस्कार, भा. रा. तांबे पुरस्कार यासह अनेक पुरस्कार व मानसन्मान लाभले आहेत. विविध दूरदर्शन वाहिन्यावर त्यांनी कविता, हास्य कवितांचे कार्यक्रम सादर केले आहेत. शिरोळ तालुक्याचे सुपुत्र व कुरुंदवाडचे डॉ.दिलीप कुलकर्णी हे नामवंत कवी म्हणून सुपरिचित आहेत. खुद्द महाकवी कुसुमाग्रजांनी त्यांच्या विडंबन कवितांची तुलना आचार्य अत्रे यांच्या विडंबन कवितांशी केली आहे. गझलकार म्हणूनही डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी मान्यता मिळवली आहे. त्यांना या साहित्य संमेलनात ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.दानोळी येथील युवा खेळाडू कु. श्रेया अशोक केसकर हिने वायनाड येथे झालेल्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे. नांदेड येथील राज्यस्तरीय स्पर्धेतही तिने रौप्य व कांस्यपदक मिळवले आहे.या उदयोन्मुख खेळाडूला यावर्षीचा ‘भाई दिनकररावजी यादव जिल्हा क्रीडा पुरस्कार’ देऊन गौरविले जाणार आहे.या साहित्य संमेलनात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा सहभाग असून रसिक श्रोत्यांना मान्यवरांच्या विचारधनासह निमंत्रित कवींच्या काव्यवाचनाचा आस्वाद मिळणार आहे. हास्यरसात चिंब करणारे कथाकथन आणि स्थानिक कवींचा बहारदार कवी कट्टा याबरोबरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणाऱ्या बदलाबाबत वैचारिक चर्चाही रसिकांना ऐकायला मिळणार आहे अशी माहितीही यावेळी सुनील इनामदार यांनी दिली.