कष्टकरी शेतमजूर संघटने तर्फे शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा

Spread the love

महसूल अधिकाऱ्यांसह आंदोलक यांची होणार 22 जानेवारीला बैठक घेण्याचे आश्वासन

शिरोळ / प्रतिनिधी

संजय गांधी यासह अन्य पेन्शनधारकांना योग्य प्रमाणात व वेळेत पेन्शन रक्कम मिळावी. नव्याने पेन्शन योजनेच्या प्रस्तावित कामामध्ये जाचक अटी रद्द कराव्यात, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून पक्षकारांना सौजन्याची वागणूक मिळावी यासह अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने गुरुवारी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान , मोर्चेधारक यांच्या वतीने नायब तहसीलदार भिसे यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान येत्या २२ जानेवारी रोजी या प्रश्नासंदर्भात आंदोलक व महसूल प्रशासन यांची तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार विलास भिसे यांनी लेखी पत्राने दिले.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिरोळ तालुक्यातून शेतमजूर एकत्र आले. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौक ते जय भवानी चौक मार्गे मोर्चा शिरोळ तहसील कार्यालयावर आला. यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. पेन्शनधारकांच्या गैरसोयी दूर व्हाव्यात याविषयी अनेकांनी मनोगत व्यक्त केले.शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासणे म्हणाले, गेल्या पाच – सहा महिन्यापासून पात्र पेन्शनधारकांना योग्य प्रमाणात रक्कम मिळत नाही.नव्याने पेन्शन चे प्रस्ताव करण्यासाठी गेलेल्या पक्षकारांना तलाठी ,सर्कल यांच्याकडून सौजन्याची वागणूक मिळत नाही. शासकीय कार्यालयांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. पक्षकार यांच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करून पेन्शन धारकांना वेळेत व योग्य रक्कम मिळाली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.या आंदोलनात सुरेश सासणे ,शोभा पाणदारे , महावीर मगदूम , औरंग मुजावर , अनिल देशमुख , शिलाताई कोळी , हौसाबाई कांबळे ,शेवंता कांबळे , श्रीमंती बोरगांवे ,सुवर्णा पाटील , मौला मुजावर , संजय दणाणे , शिवाजी कोळी , दौलत ऐनापुरे ,बाळासाहेब कांबळे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

error: Content is protected !!