कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड येथील जमिया नगर भागातील गटारीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गटारीचे काँक्रीट ढपले पडत असून यामुळे सार्वजनिक सुविधांना फटका बसत आहे. नागरिकांच्या मते, वापरलेली सामग्री ही निकृष्ट दर्जाची असून, कामातील त्रुटी निदर्शनास येत आहेत.
तरी पालिका प्रशासनाने तात्काळ ठेकेदाराला काळ्या यादीत घालून त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा लोकायुक्तकडे तक्रार करून पालिकेच्या विरोधात निदर्शने करू असा इशारा निवेदनाद्वारे शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांनी दिला आहे.
दरम्यान संबंधित ठेकेदाराने यापूर्वी शहरातील इतर भागात केलेली कामेही निकृष्ट ठरली होती. त्याच्या भूतकाळातील कामांमुळे शासकीय निधीचा अपव्यय झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र, प्रशासनाने योग्य चौकशी न करता त्याला वारंवार नवीन कामे दिली आहेत.असा आरोप उपस्थित नागरिकांनी केला.
कुरुंदवाड पालिकेवर जिल्हाप्रमुख उगळे यांनी मोर्चा काढून संबंधित ठेकेदार आणि त्यांच्या वादग्रस्त कामाबाबत पालिकेच्या कार्यालय निरीक्षका श्रद्धा वळवडे यांना निवेदन देत ठेकेदाराच्या कामांवर त्वरित स्थगिती देण्याची मागणी केली शिवाय यापूर्वी केलेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करून झालेल्या आर्थिक आणि गुणवत्ता हानीचा तपशील उघड करावा व नुकसान भरून घ्यावे त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे.भविष्यात त्याला कोणतीही सरकारी कामे दिली जाणार नाहीत. याशिवाय, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराची बिले अदा करू नयेत अशी मागणी केली.
यावेळी तालुका प्रमुख संजय अनुसे,शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे,राजू आवळे यांनी पालिकेने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्याबरोबरच आंदोलन आणि न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा पालिकेचा हलगर्जीपणा यासाठी पूर्णपणे जबाबदार राहील.शहराच्या विकासाचा विचार करता संबंधित प्रकरणाची दखल घेऊन ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.यावेळी मोर्चात दयानंद मालवेकर,नूर पठाण,प्रशांत शहापुरे, रामभाऊ माळी,राजेंद्र बेले, आप्पासो गावडे,स्वप्नील चव्हाण आदी उपस्थित होते.