अब्दुल लाट / प्रतिनिधी
जिल्ह्यात शिक्षण विभाग माध्यमिक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘स्क्रीन टाइम कमी करा, बुक टाइम वाढवा’ या संदेशाच्या आधारे विविध शैक्षणिक आणि विज्ञानविषयक उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळणार आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
अब्दुललाट ता.शिरोळ येथे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, अब्दुललाट यांच्या वतीने आयोजित 52 व्या जिल्हास्तरीय डॉ.श्रीनिवास रामानुजन विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर, तहसीलदार अनील कुमार हेळकर,गटशिक्षणाधिकारी भारती कोळी,सरपंच कस्तुरी कुरुंदवाडे,जिल्हा नियोजन समिती सदस्य दादा लाड,अमर कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी लाट एज्युकेशन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीतातून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी येडगे म्हणाले,“ग्रंथ प्रदर्शन व विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना वाचन आणि विज्ञानाची गोडी निर्माण होईल.या उपक्रमांद्वारे समाजातील समस्या सोडवण्यासाठी प्रेरणा मिळेल.विद्यार्थी तंत्रज्ञान,विज्ञान आणि वाचनाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात कसा करू शकतात हे शिकतील.या कार्यक्रमास दादासाहेब पाटील, बशीर जमादार,संदीप चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट
‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रम शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण : डॉ.आंबोकर.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या पुढाकाराने ‘कॉफी विथ कलेक्टर’ हा अभिनव उपक्रम सुरू होत आहे. यामध्ये दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.या उपक्रमामुळे शिक्षकांना आपल्या अडचणी व कल्पना मांडण्यासाठी मंच उपलब्ध होईल आणि शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडणार आहेत.डॉ.एकनाथ आंबोकर
चौकट
शैक्षणिक कार्यक्रमांत पुष्पगुच्छाऐवजी पुस्तकांचा वापर : जिल्हाधिकारी येडगे
शिक्षण विभागाच्या सर्व शैक्षणिक कार्यक्रमांत पुष्पगुच्छ न वापरता पुस्तकांचा वापर करा. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढून पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित होईल पुस्तकांचे स्वागतासाठी होणारे वितरण विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीला चालना देईल व पर्यावरणपूरक उपक्रम म्हणूनही हे उपयुक्त ठरेल, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.