अब्दुललाट / प्रतिनिधी
“विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला दिशा देणारे व्यासपीठ असून,भविष्यातील संशोधक घडवण्याची जबाबदारी अशा उपक्रमांवर आहे,प्रत्येकाने नवनवीन प्रयोग व शोधासाठी प्रयत्नशील राहावे. वैज्ञानिक दृष्टिकोन ही केवळ शिक्षणाचीच नव्हे, तर समाज सुधारण्यासाठीही महत्त्वाची गोष्ट आहे.अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी केले.अब्दुललाट ता.शिरोळ येथे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अब्दुल लाट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री अद्दाप्पा कुरुंदवाडे साहित्य नगरीत 52 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी नामदार मुश्रीफ बोलत होते अध्यक्षस्थानी आम.डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,सरपंच कस्तुरी कुरुंदवाडे,लाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ.अरुण कुलकर्णी,ज्येष्ठ साहित्यिक अदाप्पा कुरुंदवाडे, प्राचार्य डॉ देवेंद्र कांबळे, पंचायत समितीचे माजी सदस्य बंडोपंत कुलकर्णी आदि प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडीने झाली. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. आंबोकर यांच्या हस्ते या दिंडीचे उद्घाटन झाले.माजी मुख्याध्यापक के.बी गडकरी आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी बोलताना आम.डॉ.पाटील-यड्रावकर म्हणाले विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या भविष्यनिर्मितीसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवे शोध लावण्याची व प्रयोगशील होण्याची प्रेरणा मिळते. विज्ञान ही केवळ पुस्तकी गोष्ट न राहता ती जीवनाशी जोडण्यासाठी अशा प्रदर्शनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माझ्या शुभेच्छा असतील.यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन म्हणाले विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि संशोधनवृत्ती विकसित होते. आजचा विद्यार्थी उद्याचा संशोधक असतो, याची जाणीव ठेवून प्रत्येकाने प्रयोगशीलता जोपासावी. या प्रदर्शनातून भविष्यातील वैज्ञानिक घडतील, अशी अपेक्षा आहे.विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन उपयुक्त ठरते. अशा उपक्रमांमुळे नवोदित संशोधक घडण्यास मदत होते. शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांना प्रयोगशील होण्यासाठी पाठिंबा द्यावा.असे आम.आसगावकर यांनी सांगितले.यावेळी स्वागत व प्रास्ताविक करत असताना माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ.आंबोकर म्हणाले “विद्यार्थ्यांची चिकित्सक आणि संशोधक वृत्ती विकसित होणे ही काळाची गरज आहे. विज्ञान प्रदर्शन हे या उद्दिष्टपूर्तीसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. वाचन संस्कृती जपूया व्यक्तिमत्व विकास जपूया असे ही आवाहन त्यांनी केले.यावेळी डॉ. कुलकर्णी,प्रा.डॉ.कांबळे, पंचायत समितीचे कुलकर्णी, सरपंच कुरुंदवाडे आदींनी मनोगते व्यक्त केली यावेळी पालक विद्यार्थी आणि विविध शाळांचे हायस्कूलचे विद्यार्थी प्रदर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.