हातकणंगले / प्रतिनिधी
हातकणंगले इथल्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील हॅन्ड ग्लोज कंपनीस आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. हातकणंगले इथल्या लक्ष्मी औद्योगिक वसाहती मधील तुजाई सेफ्टी प्रोडक्स, ब्लॅक रोज इंडस्ट्रीज, ॲटलास प्रोटेक्टिव्ह प्रॉडक्ट या तीन कंपन्या एकाच ठिकाणी असून या कंपन्यांमध्ये हॅन्ड ग्लोज बनवण्याचे काम केले जाते. या कंपनीमध्ये दोन शिफ्ट मध्ये काम चालत असून जवळपास 200 हून अधिक महिला कर्मचारी या ठिकाणी काम करतात. या कंपनीच्या गोडाऊनला आज दुपारी दोनच्या दरम्यान अचानक आग लागली. गोडाऊनमध्ये हॅन्ड ग्लोज असल्याने काही मिनिटातच आगीने रौद्ररूप धारण केले. लक्ष्मी इंडस्ट्रीज मधील अग्निशामन गाडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा कोणताही परिणाम आगीवर झाला नाही उलट आग भडकतच राहिली. गोडाऊनच्या छताचे लोखंडी अँगल वितळून खाली पडले. तर छताच्या सिमेंट पत्र्याचा चक्काचूर झाला. जवळपास चार तास आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होता.आगीने रौद्ररूप धारण करताच महिला कामगारांच्या मोठी भीती निर्माण झाली होती. जिकडे तिकडे हाहाकार माजला होता. वर्कशॉप मधील महिला कामगारांना वर्कशॉप मधून बाहेर काढले. पण त्या महिलांना गेटवर अडवून धरण्यात आले होते. आगे मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही पण आग लागली की लावण्यात आली याची चर्चा औद्योगिक वसाहतीत सुरू होती. आग विझत आली तरीही रात्री उशिरापर्यंत धुराचे लोट बाहेर पडत होते . या घटनेची नोंद हातकणंगले पोलीसात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.