३ ते ५ जानेवारीपर्यंत अ.लाट मध्ये ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान आणि ग्रंथ प्रदर्शन

Spread the love

अब्दुल लाट / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि अ.लाट एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने 3 ते 5 तारखे दरम्यान 52 वे जिल्हास्तरीय विज्ञान आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रा.देवेंद्र कांबळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अब्दुललाट ता.शिरोळ येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात श्री आदाप्पा कुरुंदवाडे साहित्यनगरीत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.3 तारखेला दुपारी 2 वाजता वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.हसनसो मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. खा. धनंजय महाडिक, खा. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आ. सतेज पाटील, आ. अरुण लाड, आ. विनय कोरे, आ. चंद्रदीप नरके, आ. अमल महाडिक, आ. राजेश क्षीरसागर, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रा.कांबळे पुढे म्हणाले या विज्ञान आणि ग्रंथ प्रदर्शनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवकल्पना, शोध आणि शाश्वत भविष्यासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक उपायांची चर्चा करणं आहे. ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित प्रदर्शन, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांना आपले कार्य प्रदर्शित करण्याची एक अद्वितीय संधी मिळणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, आणि साहित्याचे महत्त्व समजावून सांगणे आणि त्यांना भविष्याच्या शोधात एक प्रेरणा देणे हे या प्रदर्शनाचे उद्दीष्ट आहे.प्रदर्शनाची पारितोषिक वितरण पाच तारखेला दुपारी एक वाजता सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. प्रकाश आंबीटकर, खा. धैर्यशील माने,आमदार जयंत आसगावकर,जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
हा कार्यक्रम शिरोळ पंचायत समितीच्या शिक्षणाधिकारी श्रीमती भारती कोळी आणि डॉ. देवेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले जात आहे

error: Content is protected !!