कुरुंदवाड / प्रतिनिधी
महाशिवरात्री यात्रेच्या आयोजनावरून प्रशासन,शेतकरी आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.यात्रेची जागा सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने शेतकरी आणि पदाधिकारी संतप्त आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांनी समन्वय साधून तोडगा काढण्याचे आवाहन केले.
महाशिवरात्री यात्रा गेल्या अनेक वर्षांपासून श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरली आहे. मात्र, सध्या यात्रेच्या जागेचा विषय न्यायालयीन प्रक्रियेत आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना मोबदला देऊन यात्रा भरवण्याचा प्रस्ताव मुख्याधिकारी गवळी यांनी मांडला. “सर्वांनी सहकार्य केल्यासच हा प्रश्न सोडवता येईल,” असे ही त्यांनी स्पष्ट केले.
कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय पदाधिकारी नागरिक आणि पालिका प्रशासनाच्या वतीने यात्रेचा आराखडा तयार करण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती. यात्रा कमिटीचे अध्यक्ष दादासाहेब पाटील शिवसेनेचे राजू आवळे बाबासाहेब सावगावे तानाजी आलासे सुनील कुरुंदवाडे व पालिकेचे अधिकारी आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मुख्याधिकारी गवळी म्हणाल्या महाशिवरात्री यात्रा हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे कोणत्याही अडचणीमुळे आयोजन बिघडू नये,आपण सर्वजण मिळून या विषयावर तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यात्रेचा अंतिम आराखडा आणि व्यवस्थापन यावर पुढील बैठक लवकरच होणार असल्याचे सांगितले.
यावेळी दयानंद मालवेकर,बापूसो आसंगे,अभिजित पाटील,पंत माळी, रामचंद्र मोहिते,बी.डी. सावगावे,शरद आलासे,दिलीप बंडगर,तानाजी आलासे,शाहीर आवळे,भीमराव पाटील,रविकिरण गायकवाड,अजित देसाई,कुमार माने आदींनी सूचना मांडल्या.
यावेळी जितेंद्र साळुंखे,संभाजी घोरपडे,जय कडाळे, स्वप्नील श्रीधनकर,अभय पाटूकले,बबलू पवार,रोहन बिंदगे,सिकंदर सारवान,पालिकेचे अभियंता प्रदीप बोरगे,कर निरीक्षक श्रद्धा वळवडे कार्यालय निरीक्षक,स्नेहल सोनाळकर आदी उपस्थित होते.