आदर्श गुरुकुल विद्यालयात मातृ-पितृ कृतज्ञता सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन
पेठ वडगाव / प्रतिनिधी
२०३० साली सगळ्यात प्रगत देश म्हणून भारताला ओळखले जाईल यात शंका नाही. पण आपल्या समोर नव्याने उभे असलेले संकट म्हणजे नफेखोर भांडवलदारांच्या हाती आपली सर्व सूत्रे निर्णय जात आहेत. त्यामुळे बी प्रॅक्टिकल बी कमर्शिअल हेतूने निर्माण होऊ लागलेली पिढी त्या पिढीला संस्कारशील विचारांची आवश्यकता आहे आणि यासाठी आज माता-पिता व गुरु हे दोन विद्यापीठ सक्षम असणे आवश्यक आहे.
असे प्रतिपादन संत साहित्यिक व व्याख्याते राजा माळगी यांनी व्यक्त केले.ते आदर्श गुरुकुल शिक्षण समूह पेठ वडगांव येथे आयोजित मातृ-पितृ कृतज्ञता सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा कार्यक्रमात बोलत होते.श्री माळगी पुढे म्हणाले की जगातील सर्वात श्रीमंत व्यापारी १४२ कोटी लोकसंख्या असलेला भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून बघत आहेत.हे भांडवलदार माणसांकडे केवळ एखादी यंत्र ,मशिन म्हणून बघत आहेत.
आपली कुटुंब व्यवस्था संपुष्टात आणण्याचा प्रयत्न या भांडवलदारांकडून होत आहे.आज पालक केवळ आपल्या पाल्याकडे एक एटीएम मशीन म्हणून पाहत आहे.या आधुनिक युगात सामान्य माणसाचा दृष्टिकोन स्पर्धात्मक झाला आणि यामुळे नाती हरवत चालली आहेत.आज नात्यांची शिकवण देणारा अभ्यासक्रम आवश्यक आहे.
स्वागत व प्रास्ताविकेत डॉ. डी. एस. घुगरे म्हणाले की
नववर्षाचा नवा संकल्प व नव्या पिढीसमोर नवा आदर्श ठेवण्यासाठी, कुटुंब व्यवस्था मजबूत करून चांगला आदर्श माणूस घडवण्यासाठी या मातृ-पितृ कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्नेह हृदयांनी आपल्या माता-पित्याचे पाद्यपूजन करू औक्षण केले.वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लावणी, भारुड,गोंधळ,धनगर , वासुदेवाची गीते,आदिवासी गीते, पोवाडे,कोळी गीते, चित्रपट गीते ,लघुनाटक, मुखनाटक, प्रासंगिक गीते सादर केली. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत विद्यार्थीचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
यावेळी नामदेव दादा प्रतिष्ठान पुणे संस्थापक अध्यक्ष पी.एन पाटील,सचिव सौ.एम.डी.घुगरे ,पर्यवेक्षक एस.जी.जाधव,एस.ए. पाटील,प्रशासिका एस.एस.गिरीगोसावी,मुख्याध्यापक आर.बी.शिवई, प्र.मुख्याध्यापिका एम.एस. चौगले उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.एन. इंगवले व एस.सी.शिखरे तर आभार एस.ए.पाटील यांनी मानले.
चौकट..
संकुलाचे कौतुक….
आजवर मी अडीच हजार च्या वर व्याख्याने दिली पण इतकी सुंदर शाळा मी आज पहिल्यांदा पाहत आहे.संस्कारशील उपक्रम राबवणाऱ्या या शाळेला केवळ आदर्श नाव नाही तर ती खरोखर आदर्श गुरुकुल आहे.