शिरोळ / प्रतिनिधी
ऊस दराच्या मागणीसाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस घालवताना ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी आंदोलन अंकुश संघटनेकडून शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास घालवाडमधील शेतकऱ्यांनी शुक्रवारी धरणे सहभाग घेऊन पाठींबा दिला.दरम्यान प्रशासन आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे सोमवारपासून आंदोलनाची दिशा बदलण्याचा इशारा आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांनी दिला आहे.मागील गाळप झालेल्या ऊसाला दुसरा हफ्ता २०० रुपये, आणि यावर्षी गाळपस येणाऱ्या उसाला पहिली उचल प्रतिटन३७०० रुपये देण्यात यावी. यासह विविध मागण्यासाठी आंदोलन अंकुशच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयासमोर १६ डिसेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शुक्रवारी घालवाड येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन पाठिंबा दिला.
घालवाडमधील शेतकरी सारंग परीट यांनी बोलताना सांगितले की इंट्री खुशाली संदर्भात घालवाड ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन आम्ही शेतकऱ्यांनी इंट्री खुशाली द्यायची नाही. असा एकमुखी निर्णय घेतला आहे.आणि त्याप्रमाणे गावात कोणालाही ऊस तोडणीसाठी पैसे न देता ऊसतोडी मोठया प्रमाणात सुरु आहेत. माणुसकी म्हणून ड्रायव्हरला जेवणासाठी म्हणून २०० रुपये फक्त आम्ही देत आहोत. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी आमच्या गावात सगळ्याच कारखाण्यांची ऊस तोडणी यंत्रणा जास्त आल्याने ऊसतोड लवकर होऊन शेतकरी समाधानी आहे. याचं सर्व श्रेय आंदोलन अंकुशला जात असल्याचे त्यांनी सांगितले.आजही शिरोळ तहसीलदार यांचेकडून हे आंदोलन बेदखल केले गेले. त्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. सोमवारपासून आंदोलनाची दिशा बदलणार असल्याचे आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांनी जाहीर केलं.बेमुदत धरणे आंदोलनात सारंग परीट,दिपक काळे,शीतल फडतारे, प्रशांत थोरवत,नवनाथ जाधव आदिक निकम,अभिजित पाटील, श्रीधर शेट्टी, महेश जाधव, प्रवीण माने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.