शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात महसूल विभागाला हाताशी धरून माती आणि वाळू ची राजरोस चोरी सुरु असून गौण खनिजाची ही लूट शिरोळ तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून देखील ते याबाबत गंभीर नाहीत म्हणून शिरोळ तहसीलदार यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी तक्रार करणार असल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी आज शिरोळ मध्ये पत्रकार बैठकीत सांगितले.माती व वाळू या किंमती गौण खनिजाची महसूल प्रशासनाच्या सहकार्याने कशी लूट होते हे आज पत्रकार बैठकीत सांगताना ते म्हणाले की वाळू उपसा हा अर्जुनवाड, घालवाड आणि शेडशाळ मध्ये गेले दीड महिना झाले प्रत्यक्षात सुरु आहे.पण महसूल प्रशासनाच्या कागदी रेकॉर्डात फक्त अर्जुनवाड मध्येच उपसा सुरु असून घालवाड आणि शेडशाळ मध्ये माती उपसा सुरु नसल्याचे खोटेच रेकॉर्ड केले जात आहे.दर तासाला शेकडो ब्रास वाळू उपसा करणाऱ्या बोटी वापरून रात्रंदिवस वाळू उपसा केला जात आहे.पण महसूल विभाग म्हणतोय की फक्त 73 ब्रासच वाळू नदीतून काढली असून त्यातील 8 ब्रास वाळू विकली असून 65 ब्रास वाळू डेपोवर शिल्लक आहे.अर्जुनवाड, घालवाड आणि शेडशाळ येथून हजारो ब्रास वाळू काढून त्याची परस्पर विक्री केली जात असताना आणि याची सगळी माहिती तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांना असताना यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शासनाचा महसूल तर बुडवला आहेच पण किंमती गौण खनिजाची लूट आजही सुरूच असल्याचे त्यांनी पुराव्यासह समोर आणले.
माती उपशाबद्दल पण धनाजी चुडमुंगे म्हणाले की 500 ब्रास ची प्रत्यक्षात रॉयल्टी भरून परवानगी घ्यायची आणि 5000 ब्रास माती काढून विकायची असा धंदाच शिरोळ तालुक्यात सुरु आहे आणि 5 ब्रास मोठया हायवात माती भरायची पण एक ब्रास माती वाहतूक केली म्हणून रेकॉर्ड करायचे सुरु आहे याचे काल पुरावे सुद्धा दिले होते पण महसूल विभागासह शिरोळ तहसीलदार हे यात सामील असल्यामुळे कोणतीही कारवाई होत नाही महसूल प्रशासनाच्या आशिर्वादामुळेच मातीची लूट सुरु आहे म्हणून आम्ही आता शिरोळ तहसीलदार यांचीच या गौण खनिजा बाबतीत चौकशी करा म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चौकट
गरीब,मध्यमवर्गीय कुटूंबाना बांधकामास योग्य किंमतीत वाळू उपलब्ध व्हावी म्हणून व वाळूची ठेकेदारा कडून परस्पर विक्री होऊ नये या उद्देशाने शासनाने वाळू उपसा ज्या ठिकाणी सुरु आहे त्या ठिकाणी व शासनाच्या डेपोवर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची सक्ती केली असताना फक्त वाळू डेपोवर कॅमेरे बसवले आहेत पण वाळू उपसा होतो तिथे मुद्दाम बसवले नाहीत.त्याचबरोबर सर्व वाहनांना जी पी एस सिस्टीम बसविणे अनिवार्य असताना तेही केले नाही.वाळू उपशावर सर्व नियंत्रण हे तहसीलदार यांचे असताना आणि त्यांनी याची खातरजमा करूनच उपसा सुरु आहे का हे पाहायचे असते. पण काहीही न तपासता वाळू उपसा बेकायदेशीर रित्या सुरु आहे त्याला सर्वस्वी तहसीलदार जबाबदार आहेत त्यामुळे त्यांचीच चौकशी करावी म्हणून मागणी करणार असल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.