कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड येथील मोहरम आणि गणेशोत्सव हे सण हिंदू मुस्लिम ऐक्याचे संदेश देणारे आहेत. गेल्या चार दशकापासून मुस्लिम समाजबांधव मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करून मनोभावे सेवा करतात.पूर्वजांनी सुरू केलेली परंपरा त्यांच्या वारसांनी आजही अबाधित ठेवली आहे.कुडेखान बडेनाल साहेब मशीद,ढेपणपुर मशीद, बैरागदार मशीद,शेळके मशीद आणि कारखाना मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कुरुंदवाड पीर-पंजा कमिटीचे कै.गुलाब गरगरे,कै.उस्मान दबासेकै.दिलावर बारगीर,कै.मौला जमादार, कै.वली पैलवान,कै. रमजान घोरी यांच्यासह मुस्लिम समाज बांधवांनी सन 1982 साली 4 दशकांपूर्वी गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्रित आले होते.पारंपरिक पाच मशिदीत पिरांच्या प्रतिष्ठापने बरोबरच गणपतीची प्रतिष्ठापना करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत धार्मिक एकात्मतेच्या परंपरेला सुरवात केली आहे.गणेशोत्सवाच्यावेळी मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करून मनोभावे मुस्लिम समाज गणपतीची पूजाअर्चा करतात सन 2018 ते 2020 या तीन वर्षी गणेशोत्सव आणि मोहरम सणाची 36 वर्षानंतर पुन्हा एकदा हे दोन्ही सण एकत्रित साजरे करण्याची पर्वणी आली होती. पीर आणि गणपतीची एकत्रित प्रतिष्ठापना करून समस्त हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी एकत्रित येऊन भक्तिमय वातावरणात हे सण पार पाडले.मशिदीत गणपतीच्या प्रतिष्ठापणेचे हे 42 वे वर्ष आहे.कुरुंदवाड शहर हे राष्ट्रीय एकात्मतेचे आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडवणारं शहर आहे. हे प्रेम एकतर्फी नसुन मोहरमात हिंदू बांधव पिराला मोदकांचा नैवद्य दाखवून तर गणेशोत्सवामध्ये गणपतीला मुस्लीम समाजबांधव रोठा-चोंगे व मलिद्याचा नैवैद्य दाखवून भक्तिभावाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून सण साजरा करतात.राज्यात अनेक वेळा जातीय दंगली उसळल्या असताना मात्र त्याचा शहरातील हिंदू-मुस्लीम ऐक्यावर कधीच परिणाम झाला नाही.तर कुरुंदवाडकरांनी शहरातील मशिदीतील गणपतीच्या प्रतिष्ठापनेचा आदर्श इतरांनीही घ्यावा असा संदेश दिला होता.कुरुंदवाड या ऐतिहासिक नगरीत सर्वधर्मीयांची एकात्मतेची विन आजही अखंडितपणे घट्ट आहे.
घरी पाव्हणा आल्याचा आनंद – रफिक दबासे
मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करत असताना आमच्या घरी आमचा लाडका पाव्हणा घरी आल्याचा आनंद होतो. आमच्या पूर्वजांनी सुरू केलेली परंपरा आम्हाला पार पाडायला मिळत आहे हे आमचे भाग्य आहे. गणरायाच्या माध्यमातून मशिदीत आम्ही बहुजन समाज बांधव एकत्रित येतो आणि आमची मैत्री आणखीन दृढ होते.
रफिक उस्मान दबासे