निपाणी / प्रतिनिधी
चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.याप्रसंगी त्यांनी चिकोडी लोकसभा कार्यक्षेत्रातील मुरगुंडी ते चिकोडीपर्यंत ६५ कि.मी.अंतराच्या राष्ट्रीय महामार्ग रस्ताकामाला मंजुरी दिल्याबद्दल अभिनंदन करून त्यांचे आभार मानले.याचवेळी त्यांनी चिकोडी बायपाससह चिकोडी शहरापासून गोदूरपर्यंत २७ कि.मी.चारपदरी महामार्ग डीपीआर सादर करून राष्ट्रीय महामार्गाला तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी केली.या भेटीप्रसंगी खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी चिकोडी लोकसभा मतदारसंघात राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.पुणे- बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे सुरु असणारे काम याबद्दल सविस्तर चर्चा केली. चिकोडी बायपाससह चिकोडी शहरापासून गोदूरपर्यंत रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजुरी मिळाल्यास आणि चारपदरी काम झाल्यास परिसरात होणाऱ्या वाहतूक सोयीविषयीदेखील माहिती दिली. यासाठी सदरची मंजुरी तातडीने मिळावी, अशी त्यांनी विनंती केली.याप्रसंगी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना चिकोडी बायपास व चिकोडी ते गोटूर या २७ कि.मी.चारपदरी रस्ताकामाला लवकरच मंजुरी देणार असून येणाऱ्या ५ तारखेच्या बैठकीत या मंजुरीला शिक्कामोर्तब होईल,अशी ग्वाही दिली असल्याचे खासदार जोल्ले यांनी सांगितले. याप्रसंगी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, माजी आमदार अँड.अनिल बेनके आदी उपस्थित होते.