गणपतराव पाटील यांच्यामुळेच लोक कलाकारांना प्रतिष्ठा सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे

गणपतराव पाटील यांच्यामुळेच लोक कलाकारांना प्रतिष्ठा

शिरोळमध्ये लोककला महोत्सव प्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे प्रतिपादन

सुमारे 250 कलाकारांचा कला आविष्कार सादर

कला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरोळ/ प्रतिनिधी

कला आयुष्याला उर्मी देते कलाकार आपणाला आनंद देतो पण त्याच्या वेदना कधीच समाजासमोर येत नाहीत. वेदना विसरून तो पिढ्यानपिढ्या कला जिवंत ठेवतो आहे.चांगल्या कलेतून चांगला माणूस बनतो. आनंदी जीवनासाठी कलेशिवाय पर्याय नाही.लोककला महोत्सव भरवून गणपतराव पाटील यांनी लोककलेला आणि लोक कलाकारांना प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले.
श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित तालुक्यातील कलाकारांचा मेळावा व तालुकास्तरीय निमंत्रित ‘आम्ही सारे लोककला महोत्सव’ दत्त कारखाना कार्यस्थळावरील कै. दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या क्रीडांगणावर पार पडला. महोत्सव उदघाटन प्रसंगी वसंत हंकारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दत्तचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील होते.
तालुक्यातील लोककलाकारांना विविध कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत लोककलेचे संवर्धन व्हावे याकरिता लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 250 कलाकारांचा कला आविष्कार यावेळी सादर झाला त्यास कला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमिळाला.गोंधळ, जागरण, कलगीतुरा, भेदिक, लावणी, धनगरी ढोल वादन, ओवी गायन, शाहिरी, सोंगी भजन, हलगी वादन, गजनृत्य, भारुड यासह पारंपरिक लोककला सादर करण्यात आल्या. यामध्ये 250 कलाकार सहभागी झाले होते. महोत्सवातील सहभागी कलाकारांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या महोत्सवासाठी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, समाजवादी प्रबोधिनीचे सचिव प्रसाद कुलकर्णी, कारखाना कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, दामोदर सुतार, हसन देसाई, उद्योगपती अशोकराव कोळेकर, डॉ. बाबा बोराडे, कारखाना व विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, कलारसिक उपस्थित होते.
कलाकार, मान्यवर तसेच महिला व पुरुष प्रेक्षकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
प्रारंभी स्व. सा. रे.पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कलाकारांनी अभिवादन केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. स्वागतगीत उदगाव टेक्निकल हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केले. फौंडेशनचे सचिव शेखर पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले. आभार राजेंद्र प्रधान यांनी मानले. मान्यवरांचा सत्कार गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवामध्ये डॉ. दगडू माने यांनी कलाकारांच्या विविध मागण्यांबाबत10 ठराव मांडले. त्यास सर्व कलाकारांनी एकमताने मंजुरी दिली. कोल्हापूर जिल्हा कलाकार मानधन समितीचे सदस्य श्रीनिवास कुंभार यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर कुंभार यांनी मागण्या शासनदरबारी मांडण्याचे आश्वासन दिले.लोककला महोत्सवातील ठराव पुढील प्रमाणे- १)ज्येष्ठ साहित्यिक कलावंत मानधनांचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करावे. २) मंजूर कलाकार लाभार्थ्यांना वेळेत व महिना १० हजार रुपये मानधन मिळावे. ३) शासनाकडून लोककलाकारांची रीतसर नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे.४)नोंदणीकृत कलाकारांना एसटी प्रवासामध्ये सवलत मिळावी. ५) अपघातामध्ये मयत झालेल्या कलाकार कुटुंबीयांना व अपंगत्व आलेल्या कलाकारांना पुरेशा रकमेचे विमा संरक्षण मिळावे. ६) कलाकारांच्या पाल्यांना शिक्षणामध्ये सवलती मिळाव्यात तसेच कलाकारांना नोकरीमध्ये विशेष आरक्षण देण्यात यावे. ७) शासकीय घरकुल योजनेमध्ये कलाकारांच्यासाठी विशेष राखीव कोठा ठेवण्यात यावा. ८) कला सादर करण्यासाठी गावोगावी फिरणाऱ्या लोककलाकारांनी मागणी केल्यास त्यांना पोलीस संरक्षण मिळावे. ९) कलेचे संवर्धन करीत लोककला जपणाऱ्या लोककलावंतांना जिल्हा व राज्य पातळीवर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे. १०) लोककलेचे संवर्धन करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात लोककलेचा समावेश करून नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी स्थानिक लोककलाकारांना मानधन तत्वावर नियुक्त करावे.

Spread the love
error: Content is protected !!