दत्त कारखाना कार्यस्थळावर होणार महोत्सव ; सुमारे २०० कलाकार सहभागी होणार
शिरोळ / प्रतिनिधी
येथील श्री दत्त साखर कारखान्याचे संस्थापक संचालक, चेअरमन व माजी आमदार स्वर्गीय डॉ अप्पासाहेब उर्फ सा रे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील कलाकारांचा मेळावा व तालुकास्तरीय निमंत्रित आम्ही सारे लोककला महोत्सव सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावरील कै दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या क्रीडांगणावर रविवारी ( दि. १७ ) आज दुपारी २ वाजता महोत्सवास प्रारंभ होणार आहे.अशी माहिती ( कै ) आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील सोशल फाउंडेशनचे सचिव शेखर पाटील यांनी पत्रकारांना दिली.माजी आमदार स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांच्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय लोककलाकारांचा मेळावा व आम्ही सारे लोककला महोत्सव होत आहे.तालुक्यातील लोककलाकारांना विविध कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत लोककलेचे संवर्धन व्हावे याकरता आम्ही सारे लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .या महोत्सवासाठी 30 x २५ आकाराचा भव्य रंगमंच उभारण्यात आला असून वेशभूषा रंगभूषा यासाठी स्वतंत्र कक्ष ठेवण्यात आला आहे. कलाकार , मान्यवर तसेच महिला व पुरुष प्रेक्षकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.लोककलाकार गोंधळ जागरण,कलगीतुरा, भेदिक,लावणी,धनगरी ढोल वादन,ओवी गायन, शाहिरी,सोंगी भजन,हलगी वादन,गजनृत्य,भारुड यासह पारंपारिक लोककला सादर करणारे २०० कलाकार महोत्सवात सहभागी होणार आहेत.महोत्सवातील सहभागी कलाकारांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे .यावेळी लोककलाकारांच्या विविध मागण्याबाबत प्रशासनास निवेदन देण्यात येणार आहे
या महोत्सवासाठी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस,समाजवादी प्रबोधिनीचे सचिव प्रसाद कुलकर्णी,सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे, जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे भूषविणार आहेत.तेव्हा शिरोळ तालुक्यातील सर्व कलाकारांनी कलाकार मेळाव्यासह निमंत्रित लोककला महोत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घ्यावा असे आवाहन शेखर पाटील यांनी केले.