दानोळी / प्रतिनिधी
काँग्रेसचे शिरोळ तालुकाध्यक्ष सर्जेराव सदाशिव शिंदे (वय 68) यांचे दानोळी येथे बुधवारी निधन झाले. ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत.1989 ला पहिल्यांदा सरपंच व तेव्हापासुन कायम सदस्य, दोन वेळा पंचायत समिती सदस्य, शिरोळ तालुका काँग्रेस आयचे विद्यमान तालुका अध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहिलेल्या शिंदे यांचा दानोळीच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. शिंदे यांच्या निधनामुळे दानोळीवर शोककळा पसरली आहे.
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, माजी खासदार बाळासाहेब माने, माजी आमदार जयवंतराव आवळे, माजी आमदार सा.रे.पाटील आणि गणपतराव पाटील यांचे ते कट्टर समर्थक होते. जिल्ह्यातील सर्व राजकीय नेते मंडळींशी त्यांचे जवळचे संबंध होते. आयुष्यभर ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. श्री हनुमान विकास सेवा सोसायटी, हनुमान पत संस्था, गणेश दुध संस्था यांची स्थापना केल्या आहेत. तर पत्नी सुजाता शिंदे यांना शिरोळ पंचायत समितीच्या सभापती पदी विराजमान केले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.दरम्यान, बुधवारी दानोळी गावातील मुख्य मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शोकसभा झाल्यानंतर दानोळी येथील वारणा नदीकाठावर असलेल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी जिल्ह्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.