जयसिंगपूर / प्रतिनिधी
भाजपचा मोठा गट गुरुवारी महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या गोटात सामील झाला. भाजपचे पदाधिकारी संतोष जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी गणपतराव पाटील यांना जयसिंगपूर शहरासह शिरोळ तालुक्यात मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार केला.त्यामुळे आमदार यड्रावकराना मोठा धक्का बसला आहे.आमदार यड्रावकर राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरोळ येथे त्यांच्या प्रचारास उपस्थिती लावल्याने यड्रावकर हे महायुतीचे पुरस्कृत उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान भाजपच्या शिरोळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचारात म्हणावे अशी आघाडी घेतली नव्हती हा एक चर्चेचा विषय असतानाच गुरुवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी थेट गणपतराव पाटील यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार केल्याने गणपतराव पाटील यांच्या उमेदवारीला बळ आले आहे.विशेष म्हणजे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जयसिंगपूर शहरात गणपतराव पाटील यांना वीस हजार मताधिक्य देण्याचा निर्धार करत थेट प्रचार यंत्रणेत सहभाग घेतला आहे.यावेळी बोलताना श्री जाधव म्हणाले, शिरोळ तालुक्याच्या विकासाकरिता गणपतराव पाटील हे आम्हाला योग्य उमेदवार वाटतात. दत्त साखर कारखाना, बँका, शैक्षणिक संस्था, खरेदी विक्री संघ आदींच्या माध्यमातून त्यांनी सहकारात मोठे कार्य केले आहे. क्षारपड जमिनीचा प्रश्न असो बेरोजगारीचा प्रश्न असो त्यांचे कार्य शिरोळ तालुक्याला माहित आहे. गणपतराव पाटील यांच्यासारखा आमदार तालुक्याला लाभल्यास तालुक्याचा विकास होणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जयसिंगपूर शहरासह तालुक्यात मताधिक्य देण्यासाठी आम्ही जिवाचे रान करणार आहोत.उमेदवार गणपतराव पाटील म्हणाले, संतोष जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे जयसिंगपूर शहरासह तालुक्यात चांगले मताधिक्य मिळणार आहे.
यावेळी संतोष जाधव, सुनील घोलप, पंकज गुरव ,समसुद्दीन सय्यद, भीमराव हडपद, रोहित बागडी, आशिष मोरे, माधुरी आलासकर, प्रेम पडियार, योगेश अंधारे, शशी नलवडे, महेश स्वामी, राहुल गायकवाड, प्रणेश भोसले, अभिजीत हजारे, धर्म रजपूत, यश खैरे, सतीश पवार, अनिल सुतार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पाठींबा दिला
जयसिंगपुरात २० हजाराचे मताधिक्य देणार
गणपतराव पाटील हे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार महाविकास आघाडीला लाभले आहेत. सहकार, सामाजिक, कृषी, शैक्षणिक कार्यात त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे कार्य घराघरात पोहोचवून जयसिंगपूर शहरात त्यांना २० हजाराचे मताधिक्य देणार असल्याचे संतोष जाधव यांनी सांगितले.