शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरातील विजय कोळी युवा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित कार्यक्रमात राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जाहीर पाठिंबा देत मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला.
यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते भगवान कोळी म्हणाले, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ शहरासाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे. त्यामुळे शहराचा मोठ्या प्रमाणात कायापालट झाला आहे. बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी त्यांनी शिरोळ तालुक्यात पहिली एमआयडीसी मंजूर केली. यामध्ये महिलांनाही गारमेंटच्या माध्यमातून कामाची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय जनतेच्या आरोग्याची काळजी घेत तालुक्यात ९५० बेड उपलब्ध करून उदगाव येथे सांगली सिव्हीलच्या धर्तीवर उपजिल्हा रुग्णालय निर्माण होत आहे. त्यामुळे अशा समाजाशी नाळ असणाऱ्या नेत्याला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी विजय कोळी युवा ग्रुपच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन पाठिंबा देत असल्याचे सांगितले.
यावेळी पंचगंगेचे संचालक बाबा पाटील, बाबासाहेब वनकोरे, संभाजी भोसले, विजय देशमुख, पोपटराव पुजारी, संजय शिंदे, एन.वाय. जाधव, रसूल मोमीन, पिसाळ काका, चावरे सर, विजय कोळी, दिग्विजय माने यांच्यासह विजय कोळी ग्रुपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.