शिरोळमध्ये दसरा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
सलामी देण्यासाठी ऐतिहासिक जय भवानी तोफ सज्ज
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरात साजरा होणारा ऐतिहासिक दसरा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.दसरा महोत्सवानिमित्त सलामी देण्यासाठी ऐतिहासिक जय भवानी तोफ सज्ज झाली आहे.या तोफेच्या पाच सलामी देण्यात येणार आहेत.शिरोळचा दसरा महोत्सव अवघ्या पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी विजयादशमीला साजरा होणाऱ्या या दसरा महोत्सवाची तयारी शिरोळ नगरपालिकेकडून युद्ध पातळीवर सुरू आहे.शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.तसेच येथील दसरा चौकातील दसरा महोत्सवासाठी सिमोल्लघंन आणी जय भवानी तोफ सलामी देण्यासाठी लागणाऱ्या मैदानाचे सपाटीकरण करून त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.शहरातील प्रमुख मार्ग आणि गटारींची स्वच्छता करण्यात आले आहे.या ऐतिहासिक दसरा महोत्सवात जय भवानी तोफेच्या सलामीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.कोल्हापूर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाकडून परवानगी घेऊन प्रत्येक वर्षी दसरा महोत्सवात जय भवानी तोफेच्या पाच सलामी नगरपालिकेचे पदाधिकारी आणी विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या हस्ते प्रत्येक वर्षी देण्याची परंपरा आहे.याचा मान पदसिद्ध नगराध्यक्षांना आहे.यावर्षी मात्र पालिकेवर प्रशासक असल्याने पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव जय भवानी तोफेची सलामी देण्याचा मान कुणाला देतात याचीच उत्सुकता शहरवासीयांना लागून राहिली आहे.शिरोळ नगरीतील ऐतिहासिक जय भवानी तोफेला पूर्व काळापासून महत्व आहे.कोल्हापूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष दलित मित्र भाई दिनकरराव यादव यांनी सन 1962 साली येथील दसरा महोत्सवात जय भवानी तोफेची सलामी देण्याची सुरुवात केली.ही परंपरा आजतागायत लोकल बोर्ड ग्रामपंचायत आणी आता नगरपालिकेच्या माध्यमातून अखंडित सुरू ठेवण्यात आली आहे.यावर्षी जय भवानी तोफेची दुरुस्ती करून चाकांच्या धावपट्ट्या बसविण्यात आल्या आहेत तोफेची रंगरंगोटी करण्यात आली आहे.
शिरोळ शहरात दसरा महोत्सव प्रत्येक वर्षी उत्साहात साजरा केला जातो.यानिमित्ताने पालखी सोहळा पारंपारिक वाद्याच्या गजरात जय भवानी तोफेची शोभायात्रा काढण्यात येते याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्याबरोबरच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात.नदीवेस परिसरातील दसरा चौकात जय भवानी तोफेच्या तीन सलामी तर ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज मंदिर परिसरातील मैदानात जय भवानी तोफेच्या दोन सलामी देऊन आपटा पूजन करून सिमोल्लघंन करण्यात येते या दसरा महोत्सवासाठी जय भवानी तोफ सज्ज झाली आहे.