कुंभोजच्या हिवरखान मंदिरास ‘ब’ वर्ग तीर्थस्थळ दर्जा
सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी दादासो गोरे यांच्या पाठपुराव्याला यश
धनगर बांधवांकडून साखर, पेढे वाटून आनंद उत्सव
हातकणंगले / सुकुमार अब्दागीरे
गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या कुंभोज तालुका हातकणंगले येथील हिवरखान बिरदेव मंदिराचे भाग्य सोमवारी उजळले. या मंदिराचा ‘ ब’ वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये समावेश करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. आदेश प्राप्त झाल्यानंतर समस्त धनगर बांधवांनी साखर, पेढे वाटून एकच आनंद उत्सव साजरा केला.हातकणंगले तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी,दादासो गोरे गेले दोन वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन पर्यटन मंत्री आदिती तटकरे यांना 8 जून 2022 रोजी निवेदन देऊन त्यांनी याकडे लक्ष वेधले होते.
कुंभोज पंचक्रोशीत हिवरखान बिरदेव मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. प्रत्येक अमावस्येला हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात परंतु या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा नसल्यामुळे कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या. यासाठी सागर पुजारी दादासो गोरे यांनी पुढाकार घेत या मंदिराला तीर्थस्थळाचा ब वर्ग दर्जा मिळाल्यास किमान तीन ते चार कोटी रुपये विकास कामासाठी मिळतील म्हणून मंत्रालयात पाठपुरावा केला. तत्कालीन पर्यटन मंत्री आदिती तटकरे यांना वर्षभरापूर्वी निवेदन देऊन मागणी केली. त्यांनी तात्काळ कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना सविस्तर प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कृती आराखडा तयार करून महिन्याभरापूर्वी राज्य शासनाला सादर त्यानंतर गतीने हालचाली सुरू झाल्या, आणि हिवरखान बिरदेव मंदिरास सोमवारी ‘ब’ वर्ग तीर्थ स्थळाचा दर्जा देण्यावर शिक्कामोर्तब झाले.त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील सय्यद साहेब पीर दर्ग्यालाही ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात आलेला आहे. याबाबतचे आदेश राज्याचे सहसचिव के. जी. वळवी यांनी काढलेले आहेत. यासाठी विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार राजूबाबा आवळे यांनी ही प्रयत्न केल्याचे सागर पुजारी यांनी सांगितले.