शिरोळ / प्रतिनिधी
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारून विरोधी कारखाना बचाव पॅनेलला चारीमुंड्या चित केले सत्ताधारी गटाने निर्विवाद बहुमत मिळवले दतच्या ऊस उत्पादक सभासदांनी उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.सहकार क्षेत्रातील मल्टीस्टेट असणाऱ्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती.या दरम्यान बिगर ऊस उत्पादक व संस्था गटातील संचालकाच्या 2 जागा आणि अ वर्ग उत्पादक अनुसूचित जाती जमाती गटातील संचालकाची 1 जागा अशा 3 जागा बिनविरोध झाल्या आहेत.तर संचालक मंडळातील अ वर्ग उत्पादक सभासद गटातील 16 जागेसाठी 22 उमेदवार आणि अ वर्ग उत्पादक महिला गटातील 2 जागेसाठी 3 उमेदवार असे एकूण 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे बुधवारी संचालक पदाच्या 18 जागेच्या निवडीसाठी कारखाना कार्यस्थळावर मतदान झाले होते.कारखान्याच्या 26726 सभासद मतदारांपैकी 16608 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.यावेळी 61.37% मतदान झाले होते.झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी करण्यात आली.निकाल ऐकण्यासाठी गणपतराव पाटील आणि श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलमधील उमेदवारांचे कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने मतमोजणी केंद्राबाहेर आणि श्री दत्त ग्राहक भांडार परिसरात उपस्थित होते.कारखान्याचे चेअरमन व पॅनेल प्रमुख गणपतराव पाटील हे दत्त कॅन्टीनसमोर निकाल घोषित होईपर्यंत थांबून होते.जसजसा निकालाचा कौल स्पष्ट होईल तस तसे कारखान्याचे सभासद शेतकरी आणि कार्यकर्ते यांची भेट घेऊन आनंद व्यक्त करीत होते.श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलची जशी आघाडी कळेल तसे कार्यकर्ते हालगी कैताळ तुतारीच्या निनादात गुलालाची उधळण फटाक्याची आतिषबाजी करत आणि डॉल्बीच्या तालावर ठेका धरून विजयोत्सव साजरा करीत होते.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी,जिल्हा उपनिबंधक सुनील धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी 8 वाजता श्री दत्त कारखाना कार्यस्थळावरील साखर गोडाऊन क्रमांक 11 या ठिकाणी मतमोजणी सुरुवात झाली 67 टेबलांवरती मतमोजणी प्रक्रिया पार पडली.मतमोजणी पहिल्या फेरीपासूनच सत्तारूढ सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी आघाडी घेतली होती.जसजशी मतमोजणी पूर्ण होईल तसतशी या उमेदवारांची आघाडी वाढत गेली.त्यामुळे श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्यानी विजयी झाले. या मतमोजणीत वर्ग उत्पादक सभासदाच्या गटातील 2313 मतपत्रिका अवैद्य आणि अ वर्ग उत्पादक महिला गटातील 838 मतपत्रिका बाद ठरविण्यात आल्या.या निवडणुकीत सभासदांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा कारखान्याचे चेअरमन सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांच्यावर विश्वास दाखवला निकाल जाहीर होताच गणपतराव पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी व विजयी झालेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करून विजयोत्सव साजरा करत गणपतराव पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
श्री दत्त साखर कारखान्याची निवडणूक सुरुवातीपासूनच एकतर्फी होणार ही चर्चा सभासदांच्यामध्ये होती.तसेच गणपतराव पाटील गटाचे तीन संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते.यामुळे सभासदांचे पाठबळ गणपतराव पाटील यांच्याबरोबरच राहणार असे चित्र होते.सभासदांनी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांचे सर्व उमेदवार मोठ्या मत फरक्याने विजयी केले आहेत.यामुळे गणपतराव पाटील गटात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात सभासदांनी जल्लोष साजरा केला.
श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलच्या विजयी उमेदवारांना मिळालेली मते
अ वर्ग उत्पादक सभासद गट –
गणपतराव आप्पासाहेब पाटील (13107), अमर बाबाजी यादव (13223),
अनिलकुमार दिनकरराव यादव(13286), अरुणकुमार शंकर देसाई(13181),
बाबासो शंकर पाटील(13165),
बसगोंडा मलगोंडा पाटील(12957),
दरगू गोपाळ माने-गावडे(12940),
ज्योतीकुमार सिद्धगोंडा पाटील(12697), निजामसो गौस पाटील(12656),
प्रमोद वसंत पाटील(12983),
रघुनाथ देवगोंडा पाटील(12890),
शरदचंद्र विश्वनाथ पाठक(12788),
शेखर कलगोंडा पाटील(12740),
सिद्धगोंडा बाबगोंडा पाटील(12535),
श्रीमती विनया रमेश घोरपडे (12656), विश्वनाथ धोंडी माने(12223)
अ वर्ग उत्पादक महिला सभासद संघ – सौ अस्मिता सतीश पाटील(14783), सौ संगीता संजय पाटील (कोथळीकर)(14207)
अ वर्ग उत्पादक सभासद अनुसूचित जाती जमाती संघ -सुरेश सदाशिव कांबळे (बिनविरोध)
बिगर उत्पादक सभासद व संस्था संघ – इंद्रजीत पासगोंडा पाटील,
रणजीत अशोक कदम (बिनविरोध)
विरोधी कारखाना बचाव पॅनेलच्या उमेदवारांना मिळालेली मते अशी अ वर्ग उत्पादक सभासद गट – संजय भाऊसो चौगुले(1841),
दरगू दत्तू चुडमुंगे(1701),
ज्ञानू गणपती जगदाळे(1588),
भीमराव सखाराम माने(1432),
दीपक कृष्णा पाटील (नाईक)(1483), सोमनाथ शिवलिंग तेली(1273)
अ वर्ग उत्पादक महिला गट -अलका जयवंत माने (1419)