महावीर चौगुलेंची दुध व्यवसायातून प्रगती

Spread the love

जुने दानवाड महावीर चौगुलेंची दुध व्यवसायातून प्रगती

जुने दानवाड / प्रतिनिधी

जुने दानवाड येथील चौगुले कुटुंबीय गेली पंचवीस वर्ष दुध व्यवसायात आहे. या व्यवसायात अख्ख कुटुंब रमले आहे. आई अनंतीमती आणि वडील आण्णासो यांनी सुरु केलेला व्यवसायात आज त्यांची दोन मुले आणि सुना असे सहकुटुंब दररोज गोठ्यात आपआपल्या परीने काम करतात.आईवडिलांनी पंचवीस वर्षापूर्वी दोन म्हैशीपासून सुरु केलेला व्यवसाय आज त्यांना भरभरून देतो आहे.

 

 

त्यावेळी चौगुले कुटुंबीयांची जमीन जेमतेम दोन एकर होती.त्यामध्ये उस आणि हिरव्या चाऱ्यासाठी अर्धा एकर क्षेत्र होते.आज चार एच.एफ.गाई,पाच म्हशी आणि बारा एकर क्षेत्र या व्यवसायातून तयार झाल आहे.त्यांच्या महावीर आणि अजित या दोन मुलांनी पुढे व्यवसाय वाढवत नेला.दुध उत्पादन ते गावात सुरु केलेले दुध संकलन केंद्र असा थक्क करणारा असा प्रवास आहे.

 

 

महावीर चौगुले यांनी पूर्णवेळ लक्ष घालून जनावरे आणि गोठा व्यवस्थापनातील शास्त्रीय माहिती घेतली. जनावरांच्या आरोग्याबाबत अनेक छोटे-मोठे बारकावे समजून घेतले.त्याचा त्यांना फायदा झाला.जनावरांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत झाली शिवाय दुध उत्पादनात वाढ झाली. सध्या गोठ्यामध्ये एकूण नऊ जनावरे असून बंदिस्त गोठा आहे.छतावर सरकती ग्रीलची चौकट बसवलेली असून ती उघडझाप करता येते.

 

उन्हाळ्यात गोठ्यातील तापमान नियंत्रित राहण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. जनावरांना स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी गव्हाणीच्या वरच्या बाजूस खास योजना केली असून प्लास्टिकच्या खोलगट अशा ट्रे मधील पाणी जनावरांना सहजपणे पिता येते.त्यासाठी त्यांनी पाण्याची पाइपलाईन केली आहे.

 

दररोजच्या हिरव्या चाऱ्याची गरज भागविण्यासाठी मका पिकाबरोबरच तब्बल त्यांनी एक एकर क्षेत्रावर गवत पिक घेतले आहे.सकाळी साडेपाचला त्यांचा दिनक्रम सुरु होतो. प्रथम गोठ्यात स्वच्छता केली जाते.त्यानंतर जनावरांना भरडा दिला जातो.यामध्ये दूध उत्पादनाच्या प्रमाणानुसार सरकी पेंड,गोळी पेंड,गहू भुस्सा,मका चुनी, पशुखाद्य यांचे मिश्रण करून दिले जाते.

 

 

सुक्या चाऱ्यामध्ये वाळलेले गवत,कडबा तर ओल्या चाऱ्यामध्ये गवत,मका,साखर कारखाने सुरु असण्याच्या काळात उसाचे वाडे याची कुट्टी करून दिली जाते.गाई आणि म्हशीला सरासरी ३० ते ३५ किलो चारा दिला जातो.

 

 

त्यानंतर धारा काढण्यास सुरुवात केली जाते. सकाळी सात ते साडे सातच्या दरम्यान आणि सायंकाळी साडे पाच ते सहाच्या दरम्यान धारा मिल्किंग मशीनच्या सहाय्याने काढण्यात येतात.नियमितपणे जनावरांचे लसीकरण केले जाते.वर्षभर मिळणाऱ्या शेणखताचा वापर ते आपल्या बारा एकर उस शेतीत करतात.

 

 

सकाळ आणि संध्याकाळचे मिळून म्हैशीचे ३५ लिटर आणि गाईचे ३५ लिटर दूध उत्पादन मिळते.या दुधाच्या विक्रीतून त्यांना महिन्याला एक लाख रुपये मिळतात. सर्व खर्च वजा जाता पन्नास हजार रुपये निव्वळ नफा त्यांना मिळतो.याबरोबरच चौगुले कुटुंबीयांनी पार्श्वनाथ सहकारी दुध व्यावसाईक संस्था स्थापन केली असून गावातील इतर दुध उत्पादक शेतकऱ्यांचे दुध ते खरेदी करतात.

 

 

दररोज साधारणपणे गाई आणि म्हशीचे मिळून ६०० लिटर दुध संकलन होते.ग्राहकांना विक्री करून उर्वरित दुध ते गोकुळ डेअरीकडे पाठवितात.सहकुटुंब गोठ्यात आपआपल्या परीने दररोज काम करतात.प्रामाणिकपणे कष्ट केले तर निश्चितच दुध व्यवसायातून चांगला नफा मिळतो असे महावीर चौगुले सांगतात.

error: Content is protected !!