वासल्य मांगल्य मातृत्व कर्तुत्व म्हणजेच स्त्री : सुष्मा माने गावडे
राजाराम विद्यालयात महिला दिन उत्साहात
शिरोळ / प्रतिनिधी
स्त्री म्हणजे वात्सल्य,स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्रीच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे महिला दिन. जगभरातील महिलांचा सन्मान आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो.आजची स्त्री ही रांधा, वाढा, उष्टी काढा अन् चूल आणि मूल याच्या खूप पुढे गेलेली आहे. स्त्रीचं कार्यक्षेत्र विस्तारलेलं आहे. अनेकजणींनी स्वतःला सिद्धही केलेलं आहे.तरीही आपण ‘स्त्री – अबला की सबला?’ हा प्रश्न चवीनं चघळतो. पण जगाच्या प्रगतीत स्त्रीचा सिंहाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही असे प्रतिपादन लेखिका सुष्मा माने गावडे यांनी केले.
येथील राजाराम विद्यालय शिरोळ नंबर २ येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून सुष्मा माने गावडे या बोलत होत्या त्यापुढे म्हणाल्या की स्त्री अबला की सबला हे ठरवण्यापेक्षा प्रत्येक स्त्री मध्ये रावण सुप्त रुपात अस्तित्वात आहे. आणि तो कसा? हे उपस्थित महिलांना पटवून दिलं. एकाच वेळी दहा विचार डोक्यात चालू असतानाही कोणतीच स्त्री कुठल्याच कामात कमी पडत नाही. ना कामात कुचराई करते. रावणासारखी दहा तोंडं, डोकी तिला नसली तरी ती कामाच्या आणि विचार करण्याच्या बाबतीत नेहमीच सरस ठरते.
‘बदलती फॅशन आणि बदलती स्त्री ‘ हा विषय घेऊन महिलांना योग्य-अयोग्य याबद्दल विचार करायला भाग पाडलं. फॅशन करायला हरकत नसतेच कोणाची. पण आपल्याला काय शोभेल याचा विचार करून सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवणं किती गरजेचं हेही सांगितलं.
यावेळी अध्यापिका मीनाक्षी हेगाण्णा, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे, उपाध्यक्षा शितल जगदाळे,सदस्या प्रियंका इंगळे,पत्रकार चंद्रकांत भाट यांनी मनोगत व्यक्त करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.स्वागत मुख्याध्यापिका नीता चव्हाण यांनी केले. आभार त्रिशला येळगुडे यांनी मानले.अध्यापिका सुनंदा पाटील सनी सुतार यांच्यासह महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.मेळाव्यानंतर महिलांसाठी संगीत खुर्ची उखाणा घेणे लिंबूचमचा बादलित चेंडू टाकणे यासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या.