शिरोळचा ऐतिहासिक दसरा दिमाखात; ‘जय भवानी’ तोफांच्या सलामीने आसमंत दुमदुमला! ६४ वर्षांची परंपरा जपणारा शिवकालीन सोहळा उत्साहात;

Spread the love
शिरोळचा ऐतिहासिक दसरा दिमाखात; ‘जय भवानी’ तोफांच्या सलामीने आसमंत दुमदुमला!
६४ वर्षांची परंपरा जपणारा शिवकालीन सोहळा उत्साहात; मानाच्या बैलजोड्या, मंदिरांच्या पालख्या आणि आपट्याच्या पानांच्या सोन्याने दसरा चौकात रंगली ऐतिहासिक परंपरा
शिरोळ | प्रतिनिधी
शिवकालीन परंपरेचा अभिमान, ऐतिहासिक वारशाचे जतन आणि धार्मिक उत्साहाचा अनोखा संगम असलेला शिरोळचा ऐतिहासिक दसरा उत्सव मंगळवारी (दि. २० ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटात साजरा करण्यात आला. गेल्या ६४ वर्षांपासून अखंडपणे जपल्या जाणाऱ्या या उत्सवात ऐतिहासिक ‘जय भवानी’ तोफेच्या सलामीने परिसर दुमदुमून गेला. वाद्यांचा गजर, मानाच्या दोन बैलजोड्या, विविध मंदिरांच्या पालख्या आणि आपट्याच्या पानांचे सोने लुटण्यासाठी नागरिकांची झालेली गर्दी यामुळे संपूर्ण शहरात दसऱ्याचा उत्साह ओसंडून वाहत होता.
शिरोळच्या ऐतिहासिक दसरा उत्सवाला केवळ धार्मिक महत्त्व नसून, त्याला शिवकालीन परंपरेचा वारसा लाभला आहे. या परंपरेचे प्रतीक असलेली ‘जय भवानी’ तोफ फुलांनी आकर्षक सजवून छत्रपती शिवाजी महाराज तख्त येथून शहरातील प्रमुख मार्गांवरून दसरा चौकाकडे आणण्यात आली. मानाच्या दोन बैलजोड्यांच्या साह्याने आणि वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील आबालवृद्धांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा अनुभव घेतला.
पालख्यांच्या सहभागाने सोहळ्याला धार्मिक अधिष्ठान
शहरातील श्री दत्त मंदिर,श्री.रेणुका मंदिर, श्री.बिरोबा मंदिर,श्री.विठ्ठल मंदिर आणि श्री राम मंदिरातील पालख्या या उत्सवात सहभागी झाल्या होत्या.विविध मंदिरांच्या पालख्यांची उपस्थिती, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि जय भवानी तोफेचे दर्शन यामुळे दसरा उत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव प्राप्त झाले.
सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उत्सवाच्या मुख्य विधींना प्रारंभ झाला.शिरोळच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष योगिता कांबळे यांच्या हस्ते छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या गादीचे आणि ऐतिहासिक जय भवानी तोफेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर तोफ दसरा चौकात आणण्यात आली.
तीन फैरींनी दसरा चौक दुमदुमला
दसरा चौकात शालेय शिक्षण सभापती शरद मोरे व देविका मोरे, नगरसेविका सविता पुजारी व बबन पुजारी तसेच नगरसेविका सुवर्णा कांबळे यांच्या हस्ते ऐतिहासिक जय भवानी तोफेच्या तीन फैरी उडविण्यात आल्या. तोफांच्या आवाजाने परिसर दुमदुमून गेला. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
तोफांच्या सलामीनंतर नागरिकांनी आपट्याच्या पानांचे सोने लुटत एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. परंपरेनुसार आपट्याची पाने देऊन सोन्यासारख्या नात्यांचा सन्मान करण्याची प्रथा यावेळी उत्साहात पार पडली. दसरा चौकात नागरिकांचा उत्साह आणि पारंपरिक आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
बुवाफन मंदिर परिसरात मानाच्या २ फैरी
दसरा चौकातील कार्यक्रमानंतर ऐतिहासिक जय भवानी तोफ वाद्यांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून शिरोळचे ग्रामदैवत बुवाफन मंदिर येथे नेण्यात आली. मंदिराच्या पटांगणात ऐतिहासिक तोफेच्या मानाच्या दोन फैरी उडविण्यात आल्या.नगरसेविका रेखा कोरे आणि पाटील घराण्याच्या सून त्रिवेणीदेवी पाटील यांच्या हस्ते या फैरी उडविण्यात आल्या. यानंतर पारंपरिक दसरा सोहळ्याची सांगता उत्साही वातावरणात झाली.
ऐतिहासिक वारसा जपण्याचा सामूहिक अभिमान
शिरोळचा दसरा उत्सव म्हणजे नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देणारा आणि शहराच्या सांस्कृतिक अस्मितेची जाणीव करून देणारा सोहळा आहे. ६४ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जात असल्याचे चित्र यंदाही पाहायला मिळाले.ऐतिहासिक तोफ,मानाच्या बैलजोड्या, मंदिरांच्या पालख्या आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे उत्सवाचे वैभव अधिकच खुलले.
हा सोहळा पाहण्यासाठी लहान मुलांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, नगरसेवक,नगरसेविका, विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.परंपरा, इतिहास आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा शिरोळचा ऐतिहासिक दसरा उत्सव यंदाही शहराच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देणारा ठरला.

Leave a Comment

error: Content is protected !!