गुरुपौर्णिमेनिमित्त श्री बुवाफन महाराज समाधीस्थळी हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज समाधीस्थळ येथे गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. श्री बुवाफन महाराजांच्या समाधीस्थळी विधिवत पूजन,आरती आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

श्री बुवाफन महाराज महाप्रसाद समितीच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते.शिस्तबद्ध पद्धतीने हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विविध भागांतून आलेल्या भाविकांनी समाधीस्थळी दर्शन घेत गुरुपौर्णिमेचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला.

शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज यांच्यावरील अखंड श्रद्धेतून स्वर्गीय सूर्यकांत हिरेमठ (महाराज) यांनी सन २००७ मध्ये महाप्रसाद सेवेची परंपरा सुरू केली. त्यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही सेवा गेली १९ वर्षे आजही अखंडपणे सुरू आहे. विशेष म्हणजे श्री बुवाफन महाराज महाप्रसाद समितीच्या वतीने भाविकांच्या सहकार्यातून प्रत्येक पौर्णिमेला नियमितपणे महाप्रसादाचे आयोजन केले जाते.या सेवेमुळे भाविकांमध्ये आध्यात्मिक एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होत असल्याचे भाविकांनी सांगितले.

गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्यास परिसरातील ग्रामस्थ, सेवेकरी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच असंख्य भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाप्रसादाचे नियोजन, स्वच्छता, वाहतूक आणि शिस्त राखण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

श्री बुवाफन महाराजांच्या कृपाशीर्वादाने ही सेवा पुढील काळातही अखंडपणे सुरू राहावी, अशी प्रार्थना भाविकांनी व्यक्त केली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने झालेल्या या भव्य महाप्रसाद सोहळ्याने भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला.

Leave a Comment

error: Content is protected !!