शिरोळ / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ यांच्यावतीने शिर्डी येथील श्री साई पालखी निवारा या ठिकाणी गुरुवार दि.३० जुलै ते शनिवार दि.१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराला राज्यातील साखर कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कोषाध्यक्ष प्रदीप उर्फ बाळासाहेब बनगे यांनी केले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साई पालखी निवारा येथे तीन दिवसीय साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर होणार आहे. गुरुवार दि.३० जुलै रोजी या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचे उद्घाटन होणार आहे. माजी मंत्री व आमदार जयंत पाटील, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार मोनिकाताई रांजळे, आमदार अशितोष काळे, सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत राहणारआहेत.या दिवशी ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड. ए. पी. चौगुले यांचे नवीन श्रम संहिता व कामगारांनी घ्यावयाची दक्षता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. साखर कारखानदारीतील गाढे अभ्यासक संजय वढावकर यांचे कारखानदारी आणि कामगारांची अवस्था या विषयावर व्याख्यान होणार आहे.
शुक्रवार ३१ जुलै २०२६ रोजी अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार विवेक कोल्हे, भोगावती साखर कारखाना कोल्हापूरचे चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दिवशी मिलिंद रानडे यांचे कामगार चळवळ व त्यापुढील आव्हाने या विषयी व्याख्यान होणार आहे. ॲड. संतोष मस्के यांचे कामगार कायदे व चळवळ याविषयी व्याख्यान आयोजित केले आहे. ॲड. दीपक भालेराव यांचे नवीन कामगार कायदे याविषयी व्याख्यान होणार आहे.
शनिवार दि.१ ऑगस्ट २०२६ रोजी शिबिरार्थी साखर कामगारांचे मनोगत होणार आहेत. या शिबिराचा सांगता समारंभ माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री शंकराव गडाख, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, श्री दत्त उद्योग समूह शिरोळचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील, छत्रपती साखर कारखाना भवानी नगरचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात साखर कामगारांचे प्रश्न सोडवणे त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन साखर कामगारांच्या प्रगतीसाठी दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातून सर्व साखर कामगारांनी मोठ्या संख्येने शिबिरात उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस राऊसाहेब पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, अविनाश आपटे कोषाध्यक्ष प्रदीप उर्फ बाळासाहेब बनगे, उपाध्यक्ष युवराज रणवरे, अशोक बिराजदार, दत्तात्रय निमसे, नितीन बनकर, प्रदीप शिंदे, सचिव राजेंद्र तावरे, संजय मोरबाळे, योगेश हंबीर सयाजी कदम, संजय पाटील यांनी केले आहे.