कोरगावकर कॉलनीतील भल्या मोठ्या दगडांमुळे वाहतुकीला अडथळा; केएमटी बससेवा बंद होण्याच्या मार्गावर

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 

शिरोली माळवाडी परिसरातील कोरगावकर कॉलनीमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन भल्या मोठ्या दगडांमुळे वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण झाला असून, या मार्गावरील केएमटी बससेवा बंद होण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी अनेकदा संबंधित प्रशासनाकडे दगड हटविण्याची मागणी केली असतानाही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.कोरगावकर कॉलनी हा वाढत्या लोकवस्तीचा परिसर असून या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, नोकरदार तसेच ज्येष्ठ नागरिकांची ये-जा सुरू असते. रस्त्याच्या कॉर्नरला येणाऱ्या दोन मोठ्या दगडांमुळे मोठ्या वाहनांना वळसा घ्यावा लागत आहे. विशेषतः केएमटी बसचालकांना बस चालविताना औद्योगिक वसाहती मधील अवजड वाहनांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बसचालकांनीही या अडथळ्याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास या मार्गावरील केएमटी बससेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. बससेवा बंद झाल्यास विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोजंदारीवर जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.रस्त्याची रुंदी आधीच कमी असताना हे दगड वाहतुकीस मोठा अडथळा ठरत आहेत. समोरून वाहन आल्यास एक वाहन थांबून दुसऱ्याला मार्ग द्यावा लागत असल्याने वाहतूक कोंडीही होत आहे. आपत्कालीन सेवांची वाहनेही या मार्गावरून जाताना अडचणीत येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून हे दोन्ही दगड हटवावेत, अशी मागणी केली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि केएमटी बससेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपाययोजना केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!