शिरोळ / प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रातील प्रगत, प्रयोगशील व नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा त्यांच्या बांधावर जाऊन सन्मान करण्यात आला.उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी शेतीमध्ये राबविलेल्या आधुनिक, नाविन्यपूर्ण व आदर्श शेती पद्धतींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शिरोळ येथे उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत ऊस उत्पादनवाढ, पीक व्यवस्थापन, सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे उपाय, सुपर केन नर्सरी, खत व पाणी व्यवस्थापन, वेळेचे नियोजन तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यावर उपाययोजनाही सुचविण्यात आल्या. यावेळी संचालक दरगु गावडे, धनाजी पाटील नरदेकर, पंडित काळे, बापूसो गंगाधर, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा व ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील उपस्थित होते.
कवठेगुलंद येथील युवा प्रगतशील शेतकरी अविनाश कदम यांचा श्री दत्त कारखान्याचे संचालक भैय्यासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
औरवाड येथे शेतकरी चंद्रकांत गावडे यांच्या शेतीप्लॉटवर कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच संजय कोल्हे यांच्या ८६०३२ ऊस प्लॉटची पाहणी करून त्यांनी अवलंबिलेल्या आधुनिक शेती पद्धतींची माहिती घेण्यात आली.
यडूरवाडी येथील शेतकरी राजू दत्ता माने व त्यांचे पुत्र शिवराज माने यांच्या ६० गुंठे क्षेत्रातील ८६०३२ ऊस प्लॉटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सहा फूट सरी अंतर, डबल ठिबक सिंचन, ठिबकद्वारे नियमित खत व्यवस्थापन, मोठ्या प्रमाणावर शेणखताचा वापर तसेच हरभरा व उडीद पिकांच्या बेवडीद्वारे जमिनीची सुपीकता वाढविण्याचे प्रयोग त्यांनी यशस्वीपणे राबविले आहेत. ऊसाबरोबरच फळभाज्या व पालेभाज्यांचे उत्पादन घेत असून टोमॅटो पिकातून त्यांनी एकरी सुमारे अडीच लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळविल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संचालक अमर यादव यांनी शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करत अशा प्रयोगशील शेतीतून इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी पत्रकार, शेतकरी व मांजरी सेंटरचा कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
बेडकिहाळ येथे अशोक सुभेदार यांच्या शेतीप्लॉटवर कृषी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संचालक इंद्रजीत पाटील, आप्पासाहेब पाटील तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते. तर संचालक शेखर कलगोंडा पाटील यांनी नांदणी, हरोली, जांभळी व धरणगुती परिसरातील प्रगत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री दत्त उद्योग समूहाचे संचालक, शेती विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी विविध गावांतील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या नाविन्यपूर्ण कार्याचा गौरव केला. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, उत्पादनवाढ व शाश्वत शेतीचा संदेश देत कृषी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला.