अनुसूचित जातीच्या एकजुटीविरोधातील उपवर्गीकरणाला तीव्र विरोध – आम. अशोकराव माने, मुंबईत मागासवर्गीय समाजाचा विराट मोर्चा, सरकारला आक्रमक इशारा
मुंबई / प्रतिनिधी
अनुसूचित जातीची एकजूट अबाधित राहावी आणि जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आज मुंबईत संपूर्ण राज्यातील मागासवर्गीय समाजाचा विराट मोर्चा मोठ्या संख्येने व आक्रमक पवित्र्यात पार पडला. राज्यभरातून हजारो समाजबांधव, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते सहभागी झाले होते. या मोर्चामुळे मुंबईत सामाजिक व राजकीय वातावरण तापले.
या मोर्चामध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलितमित्र अशोकराव माने यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सक्रिय सहभाग नोंदवत उपवर्गीकरणाला ठाम विरोध दर्शवला. त्यांनी उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडण्याचा धोका निर्माण होईल, असे स्पष्ट करत सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी केली.यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली. समाजातील ऐक्याला धक्का लावणाऱ्या कोणत्याही धोरणाला तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.उपवर्गीकरण हे समाजात संघर्ष निर्माण करणारे पाऊल असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आमदार ज्ञानराज चौगुले,डॉ दांडगे यांनीही या मोर्चात सहभागी होत मागासवर्गीय समाजाच्या हक्कांवर परिणाम करणाऱ्या निर्णयांना कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही असा इशारा दिला.
मोर्चादरम्यान एकजूट राखा,उपवर्गीकरण नको, समाजात फूट पाडू नका अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.मुंबईतील प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला.
या विराट मोर्चातून मागासवर्गीय समाजाने आपली एकजूट आणि आक्रमक भूमिका स्पष्ट करत सरकारला थेट इशारा दिला असून,पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.