शिरोळ शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात; पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरोळ / प्रतिनिधी
पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक पाच वर्षांखालील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस देणे अत्यंत आवश्यक असून, बालकांच्या सुदृढ व निरोगी भविष्यासाठी पालकांनी लसीकरणाबाबत जागरूक राहावे, असे प्रतिपादन शिरोळ नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. कल्पना पंडित काळे यांनी केले.
शिरोळ शहरात रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान यशस्वीपणे पार पडले. शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर सकाळपासूनच पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. या अभियानाला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने आपल्या पाल्यांना लसीकरण केंद्रावर आणून पोलिओचे दोन थेंब पाजले.
यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. कल्पना काळे यांनी विविध लसीकरण केंद्रांना भेट देऊन अभियानाचा आढावा घेतला. त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तसेच आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक केले. शासनाच्या आरोग्यविषयक उपक्रमांना नागरिकांनी सहकार्य केल्यास पोलिओसारख्या गंभीर आजारांवर कायमस्वरूपी मात करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या मोहिमेदरम्यान शिरोळच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे, नगरसेविका सौ. सविता पुजारी, नगरसेवक दीपक भाट, माजी नगरसेवक पंडित काळे, पत्रकार चंद्रकांत भाट यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व लोकप्रतिनिधींनी लसीकरण केंद्रांना भेटी देत अभियानाला प्रोत्साहन दिले. नागरिकांशी संवाद साधून प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ लस पोहोचविण्याचे आवाहनही करण्यात आले.
शहरातील आरोग्य विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण मोहीम राबविल्यामुळे अभियान सुरळीत पार पडले. आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांनी घराघरात जनजागृती करून पालकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे शिरोळ शहरातील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी ठरल्याचे समाधान आरोग्य विभागाने व्यक्त केले.