गोकुळ निवडणुकीत शिरोळ तालुक्याची भूमिका ठरणार निर्णायक?

Spread the love

दूध संस्थांचे ठराव आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे जमा; राजकीय घडामोडींना वेग

शिरोळ / प्रतिनिधी

गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील सहकारी दूध संस्थांनी आपले अधिकृत ठराव शिरोळचे आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे जमा करण्यास सुरुवात केली आहे.तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ठराव येत असल्याने गोकुळच्या निवडणुकीतील राजकीय वातावरण तापू लागले असून निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.सध्या कोणत्या उमेदवाराला संधी दिली जाणार याबाबत स्पष्ट चित्र समोर आलेले नसले,तरी विविध दूध संस्थांकडून दाखविण्यात येणारा पाठिंबा आणि जमा होणाऱ्या ठरावांमुळे आमदार यड्रावकर यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गोकुळच्या सत्तासमीकरणात शिरोळ तालुक्याचा प्रभाव वाढत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.विशेष म्हणजे, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिरोळ तालुक्याला संचालक मंडळावर प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तालुक्याला न्याय मिळावा आणि गोकुळच्या संचालक मंडळावर शिरोळचा प्रतिनिधी असावा,अशी भावना दूध उत्पादक संस्था आणि कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.तालुक्यातील विविध भागांतून ठरावांचा ओघ सुरू असल्याने संभाव्य उमेदवारांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.कोणत्या चेहऱ्याला संधी मिळणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा नसली तरी आगामी काळात राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दरम्यान, शिरोळ तालुक्यातील दूध संस्थांची एकजूट आणि वाढता सहभाग पाहता गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत तालुक्याची भूमिका निर्णायक ठरणार का, याकडे आता केवळ शिरोळच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!