भ्रष्टाचारमुक्त शिरोळच्या सर्वांगीण विकासासाठी यादव पॅनेल कटिबद्ध – उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव 

Spread the love

प्रभाग क्र. ८ व १० मधील विकासकामांचा शुभारंभ उत्साहात

शिरोळ / प्रतिनिधी 

शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवून शिरोळचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिव-शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलचे सर्व पदाधिकारी,नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक एकजुटीने कार्यरत राहतील,असा विश्वास शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी व्यक्त केला.प्रभाग क्रमांक ८ मधील काळे समाज तालीम बांधकाम तसेच प्रभाग क्रमांक १० मधील श्रीराम मंडळ सभागृहाच्या उर्वरित कामांचा शुभारंभ मान्यवर व स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उत्साहात करण्यात आला.यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

शहराच्या प्रगतीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने विकासकामे राबविण्याचा निर्धार व्यक्त करताना पृथ्वीराजसिंह यादव म्हणाले की,आगामी काळात शिरोळ शहरात सुमारे १२ कोटी रुपयांची विविध विकासकामे हाती घेतली जाणार आहेत.शहराच्या प्रत्येक भागाचा समतोल विकास व्हावा यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून नागरिकांच्या अपेक्षांनुसार कामांना गती दिली जाईल.ते पुढे म्हणाले की, स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे, पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे,भुयारी गटार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे यासह शहरातील रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले जातील.शहराच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे आवश्यक असून लोकसहभागातूनच प्रगतीचा मार्ग अधिक मजबूत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.पालिकेवर सत्ता आल्यानंतर जनहिताला प्राधान्य देत पारदर्शक कारभार सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.“जनतेने मोठ्या विश्वासाने सत्ता दिली आहे.त्या विश्वासाला तडा जाऊ न देता भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख प्रशासन देण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.कार्यक्रमात नगराध्यक्षा योगिता कांबळे, नगरसेविका कल्पना काळे, अनुराधा गुरव, नगरसेवक दीपक भाट,सचिन शिंदे तसेच माजी नगरसेवक पंडित काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.शहराच्या विकासासाठी सर्वांनी कटिबद्ध राहून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.यावेळी शिव-शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलचे नेते प्रताप उर्फ बाबा पाटील, बी.जी. माने, गजानन संकपाळ, मानसिंगराव पाटील, आनंदराव माने देशमुख, रावसाहेब माने, गुरुदत्त देसाई, बजरंग काळे, खंडेराव जगदाळे, अविनाश उर्फ पांडुरंग माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच नगरसेवक विजय आरगे, ओंकार गावडे, राहुल कोळी, उल्हास आवळे, नगरसेविका सुवर्णा कांबळे, शोभा कोरे, सविता पुजारी, माजी नगरसेवक विठ्ठल पाटील, बबन पुजारी, प्रमोद पाटील, भालचंद्र ठोंबरे, राजू साळवी, विजय माने, बाळासाहेब गावडे, संभाजी संकपाळ, प्रकाश गावडे, सुखदेव माने यांच्यासह काळे समाज बांधव आणि श्रीराम मंडळ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विकासकामांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.शिरोळ शहराच्या प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांची एकजूट भविष्यात अधिक विकासाची नवी दिशा ठरवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

दिवंगत पै.तुकाराम बाबर यांची तालीमीची अपूर्ण इच्छा पूर्ण

यादव घराण्याच्या तिसऱ्या पिढीकडूनही तालमीचे बांधकाम शिरोळातील काळे समाज तालीमचे बांधकाम तात्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आमदार दलित मित्र दिनकरराव यादव यांनी पहिल्यांदा केले.दुसऱ्यांदा त्यांचे सुपुत्र व शिरोळचे तात्कालीन सरपंच व दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांनी आपल्या कार्यकाळात पुन्हा काळे समाजाची तालीम बांधली.यानंतर आता आमदार दिनकरराव यादव यांचे नातू उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी या तालमीसाठी निधी उपलब्ध केला आणि आज बांधकाम शुभारंभ करण्यात आला.यादव घराण्याच्या तिसऱ्या पिढीने सुद्धा काळे समाजाच्या मागणीची पूर्तता केली.दिवंगत पै.तुकाराम बाबर यांचीही या निमित्ताने अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्याची माहिती माजी नगरसेवक पंडित काळे यांनी दिली.

Leave a Comment

error: Content is protected !!